राज ठाकरेंनी कसली निवडणुकीसाठी कंबर; करणार महाराष्ट्राचा १० दिवसीय दौरा

कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही राज ठाकरे जातील, अशी माहितीही नांदगावकर यांनी दिली. उत्तर महाराष्ट्राची बैठक नाशिक येथे न होता जळगावला घेण्यात येणार आहे.

  मुंबई, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनसे नेत्यांसोबत आगामी निवडणुकांच्या रणनितीबाबत बैठक राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बोलावण्यात आली होती. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक पार पडली.

  युती आणि आघाडी न करता जनाधाराची चाचपणी
  राज्यातील १५ महानगर पालिकांसह नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये सध्या तरी मनसेने ‘एकला चालो रे ची भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात येत असून राज ठाकरे यांच्या दौ-यानंतर त्याबाबत पुन्हा आढावा घेतला जाणार आहे त्यामुळे सध्या या बैठकीत कुणाशीही युती आणि आघाडी न करता मनसेला राज्यभरातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळणारा जनाधार दाखवुन देण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

  सहाही विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा
  त्या करीताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या सहाही विभागांमध्ये दौऱ्यांवर जाणार असून सर्वप्रथम मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. येत्या १४ डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

  राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.  यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत कश्या प्रकारे कार्यकर्त्यांना तसेच नेत्यांना या दौ-यात उपस्थित राहता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. १६ डिसेंबर रोजी राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी पुण्यात जातील.

  अयोध्येलाही जाण्याचा निर्णय
  त्यानंतर कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही राज ठाकरे जातील, अशी माहितीही नांदगावकर यांनी दिली. उत्तर महाराष्ट्राची बैठक नाशिक येथे न होता जळगावला घेण्यात येणार आहे. अयोध्येलाही जाण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगत याची तारीख अद्याप निश्चित होणे बाकी असून राज ठाकरे यांचा दौरा संपल्यानंतर नेत्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितले.