राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?, केलं सूचक विधान; म्हणाले…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी क्रांती संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना भाजपमध्ये ऑफर दिली आहे. तर, महाविकास आघाडीत राहायचे की नाही याचा निर्णय येत्या 5 एप्रिल रोजी घेणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. 

    कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी क्रांती संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना भाजपमध्ये ऑफर दिली आहे. तर, महाविकास आघाडीत राहायचे की नाही याचा निर्णय येत्या 5 एप्रिल रोजी घेणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

    दरम्यान येत्या 5 एप्रिल रोजी पक्षाचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुका अवघ्या दोन वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजू शेट्टी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे सरकार जुल्मी सरकार आहे. शेतकरी, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. केवळ एकमेकांवर चिखलफेक करण्यात सत्ताधारी आणि विरोधक मग्न झाले आहे. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रं यावं, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं.

    भाजप नेत्यांनी राजू शेट्टींची घेतली भेट

    कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी आज राजू शेट्टी यांची भेट घेऊन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली. शेट्टी आणि भाजप नेते यांच्यात याबाबत तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र, शेट्टी यांनी भाजप नेत्यांना कोणतंही आश्वासन दिलं नाही. येत्या 5 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यकारिणी मेळाव्यात याबाबतचा निर्णय घेऊ, असं शेट्टी यांनी भाजप नेत्यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, राजू शेट्टी यांची भाजप नेत्यांनी भेट घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे.