भीमानदीत आढळला दुर्मिळ सोनेरी मासा; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

गणेगाव दुमाला (ता. शिरुर) येथील मच्छिमारांना मासेमारी करताना दुर्मिळ असा सोनेरी रंगाचा मासा (Rare Golden Fish) जाळयात सापडला. हा मासा साधारणपणे अडीच किलो वजनाचा आहे. हा दुर्मिळ मासा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

    मांडवगण फराटा : गणेगाव दुमाला (ता. शिरुर) येथील मच्छिमारांना मासेमारी करताना दुर्मिळ असा सोनेरी रंगाचा मासा (Rare Golden Fish) जाळयात सापडला. हा मासा साधारणपणे अडीच किलो वजनाचा आहे. हा दुर्मिळ मासा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

    येथील भीमानदीच्या पाण्यात पारधी समाजातील चलास भोसले यांचे कुटुंबीय सुमारे अनेक वर्षांपासून मासेमारी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या कामात त्यांना मुले सुहास, विलास व महेश हेही मदत करित आहेत. शनिवारी हे तिन्ही बंधू नदीच्या पाण्यात मासेमारी करीत होते. यावेळी त्यांच्या जाळ्यात एक सोनेरी (गोल्डन) रंगाचा दुर्मिळ मासा सापडला. हा मासा सोनेरी रंगाचा असून, त्याच्या अंगावर खवले नाहीत. खवल्याऐवजी काटे आहेत. काळ्या व सोनेरी रंगाची सुंदर अशी नक्षीही त्याच्या अंगावर आहे. त्याचबरोबर या माशाचे डोळे अतिशय चमकदार आहेत. हा मासा साधारणपणे अडीच किलो वजनाचा आहे.

    जलचर अभ्यासकांच्या मतानुसार हा मासा सकर जातीचा असावा. त्याचे तोंड गोल वर्तुळाकार असे आहे. त्यामुळे आपले भक्ष तो सहजपणे ओडून घेतो. या प्रकारचा मासा या परिसरात कधीही यापूर्वी आढळला नाही. त्यामुळे हा मासा हजारो मैलांचा प्रवास करुन आलेला असावा, असे मच्छिबीज उत्पादन व संशोधन अभ्यासकांचे मत आहे.

    माशाचे संगोपन करणार

    मच्छिमार भोसले कुटुंबीयांनी सांगितले, या सोनेरी रंगाच्या माशाला आम्ही घरी पाण्याच्या टाकीत ठेवले आहे. शासनाने मागणी केल्यास त्याला शासनाच्या ताब्यात देण्यात येईल; अथवा शेततळे किंवा विहिरीत या माशाचे संगोपन केले जाईल.