पुण्यातील ९ लाख लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ ;  गणेशोत्सवासह दिवाळी होणार गोड

    पुणे : गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने राज्य सरकारने अवघ्या शंभर रुपयांत दिलेला ‘आनंदाचा शिधा’ आता गणेशोत्सवासह दिवाळीत मिळणार आहे. त्याचा लाभ शहरातील तीन लाख ३३ हजार, तर जिल्ह्यातील पाच लाख ७४ हजार अशा नऊ लाख सात हजार शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. मात्र, शिधा वितरण कधीपासून होणार, हे अद्याप निश्चित झाले नाही.

    -अवघ्या १०० रुपयांत हा शिधा
    राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्या स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त या सरकारने गेल्या वर्षी दिवाळीला ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा उपक्रम सुरू केला. त्या उपक्रमानंतर यंदाच्या वर्षी गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने हा शिधा देण्याचे जाहीर केले होते. अवघ्या १०० रुपयांत हा शिधा देण्यात येणार आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे आठ लाख ९० हजार शिधापत्रिकाधारकांना झाला होता. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एक किट याप्रमाणे हे शिधावाटप होणार आहे. आनंदाच्या शिधाच्या किटमध्ये रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल प्रत्येकी एक लिटर यांचा समावेश असणार आहे.

    -सरकारकडे किटची मागणी
    ‘शहरात तीन लाख २९ हजार ९०७ प्राधान्य कुटुंब लाभार्थी आहेत. अंत्योदय योजनेतील सात हजार ३७० लाभार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी तीन लाख ३७ हजार २७७ किटची शहरात मागणी करण्यात आली आहे. पाडव्याला शहरात तीन लाख १७ हजार ८८१ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. त्यात आता वाढ झाली आहे. त्यानुसार सरकारकडे किटची मागणी केली आहे,’ असे शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.

    -गणेशोत्सवासाठी मागवले किट
    जिल्ह्याच्या अन्नधान्य पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर म्हणाल्या, ‘जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबातील पाच लाख ४० हजार ७४४; तसेच ४८ हजार ५७० एवढे अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत. त्यानुसार पाच लाख ८९ हजार ३१४ एवढे लाभार्थी आहेत; परंतु गणेशोत्सवासाठी पाच लाख ७४ हजार ५९ एवढ्या किटची मागणी सरकारकडे केली आहे. पाडव्याला वाटप झालेल्या शिधा किटच्या संख्येनुसार ही मागणी राज्य सरकारकडे नोंदवली आहे.’

    आनंदाचा शिधा वाटप ‘ई-पॉस’द्वारे दिला जाईल. ‘ई-पॉस’ची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाईल. जिल्ह्यात गेल्या वेळी एकूण पाच लाख ६० हजार ६१९ जणांना याचा लाभ मिळाला होता.

    - डॉ. सीमा होळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी