भूमिगत जलबोगदा खणन कामात पालिकेची विक्रमी कामगिरी; अमरमहाल ते परळ 526 मीटरच्या बोगद्याचे काम एक महिन्यात पूर्ण

    मुंबई : पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने भूमिगत जल बोगद्यांच्या खणन कामात नवीन उच्चांक नोंदवला आहे. एका महिन्यात ५२६ मीटर खणन तर एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा करण्याची किमया महानगर पालिकेने साध्य केली आहे.

    किनारी रस्ता प्रकल्पाने भूमिगत बोगदा खणन करण्याची विक्रमी कामगिरी नुकतीच साध्य केल्यानंतर त्यापाठोपाठ पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने ही कामगिरी केल्यामुळे पालिकेच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक होत आहे.

    पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याच्या वतीने पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत. अमरमहाल ते परळ हा सुमारे ९.६८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा आणि परळ भायखळा आणि कुर्ला या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यास मदत करणार आहे. तर अमरमहाल ते ट्रॉम्बे उच्च पातळी जलाशयापर्यंत जाणारा दुसरा बोगदा हा सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा असून त्याद्वारे चेंबूर आणि गोवंडी विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे.

    हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर बांधण्यात येत असून त्यांचा व्यास ३.२ मीटर इतका आहे. या दोन्ही बोगद्यांमधून येणार्या भूमिगत जलवाहिन्या ह्या भूपृष्ठावरील मुख्य जलवाहिनी आणि सेवा जलाशय यांना जोडल्या जाणार आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर स्थित दोन मुख्य जलवाहिन्यांमधून येणारे पाणी या बोगद्यांद्वारे पुढे जाणार आहे.

    या भूमिगत जलबोगद्यांसाठी ‘टेराटेक’ कंपनीचे बोगदा खणन संयंत्र कार्यान्वित आहे. या संयंत्राने नुकतीच विक्रमी कामगिरी साध्य केली आहे. अमरमहाल ते परळ या पहिल्या भूमिगत जलद बोगद्याच्या कामामध्ये डिसेंबर २०२१ या एकाच महिन्यात तब्बल ५२६ मीटर खणन पूर्ण करण्यात आले आहे. बोगद्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या ८५ दिवसांच्या कालावधीत सुमारे एक किलोमीटरचे खणन पूर्ण करण्याची कामगिरी यामुळे साध्य झाली आहे. ही कामगिरी अपूर्व स्वरूपाची मानली जात असून त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञांकडून महानगरपालिकेचे कौतुक केले जात आहे.