‘शेतकर्‍यांची वीज तोडणी केली तर याद राखा’; कृषी सभापती अनिल मोटे यांचा इशारा

शेतकऱ्याकडे असलेल्या जनावरांचा विचार करता त्यासाठी एक तास तर किमान दिवसा लाईट सोडावी. असे न केल्यास किंवा मोगलाई पद्धतीने शेतकऱ्यांची वीज तोडणी केल्यास सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनावरे महावितरण विभागाच्या कार्यालयासमोर आणली जातील, असा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अनिल मोटे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

    सोलापूर : महावितरण विभागाने ज्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी बिले भरले नाहीत, अशा शेतकऱ्यांची लाईट कनेक्शन तोडली जात आहे. परंतु, शेतकऱ्याकडे असलेल्या जनावरांचा विचार करता त्यासाठी एक तास तर किमान दिवसा लाईट सोडावी. असे न केल्यास किंवा मोगलाई पद्धतीने शेतकऱ्यांची वीज तोडणी केल्यास सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनावरे महावितरण विभागाच्या कार्यालयासमोर आणली जातील, असा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अनिल मोटे (Anil Mote) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

    जिल्हा परिषदेची स्टॅंडिंग बैठक गुरुवारी झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उमेश पाटील आदी सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना कृषी सभापती म्हणाले, महावितरण विभागाकडून रीडिंगप्रमाणे बिल आकारले जात नसून, अधिक दिले जात आहेत. त्यामुळे थकबाकीचा आकडा अधिक दिसत आहे. परंतु, वास्तविक पाहता शेतकऱ्यांचा वापर खूपच कमी आहे. त्यामुळे जेवढा वापर केला तेवढेच वीजबिल आले पाहिजे.

    याबरोबरच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील पाच वर्षांमध्ये करण्यात आलेल्या विविध कामावरची माहिती कृषी सभापती यांनी मागितली आहे. स्वच्छ भारत अभियानाचे काम हे संशयास्पद आहे. त्यामुळे या अभियानाची संपूर्ण माहिती देण्याची मागणी याप्रसंगी केली आहे.