‘थर्टी फर्स्ट’वर निर्बंधांचा अंकुश; नियम मोडल्यास कडक कारवाईचा पोलीस प्रशासनाचा इशारा

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रात्री बाराच्या ठोक्याला तरुणांसह इतर वयोगटातील लोकही थिरकत असतात. हॉटेल्स, क्लब यांच्याकडून खास मद्यपार्ट्यांचे आयोजन करण्यात येते.

  नागपूर (Nagpur) : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रात्री बाराच्या ठोक्याला तरुणांसह इतर वयोगटातील लोकही थिरकत असतात. हॉटेल्स, क्लब यांच्याकडून खास मद्यपार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. थर्टी फर्स्ट म्हणून ही रात्र साजरी केली जाते. हॉटेलकडूनही खास पॅकेज दिले जातात. मात्र, यंदा रेस्टॉरेंट, बार रात्री १२पर्यंत सुरू राहणार असले; तरी पार्टी करण्यास मनाई करण्यात आल्याने थर्टी फर्स्टच्या ठोक्याला शांतता असणार आहे. दरम्यान, अवैध मद्यपार्ट्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले आहे.

  सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठीची थर्टी फर्स्टची रात्र अविस्मरणीय ठरविण्यासाठी खास पार्ट्यांचे नियोजन करण्यात येते. देशी-विदेशी दारूंचा समावेश असलेल्या पार्ट्या रंगतात. मात्र, यंदा करानामुळे मद्यालय आणि बिअर बारच्या वेळा वाढवून देण्यात आल्या असल्या, तरी नागरिकांना मात्र पार्ट्यांचा आनंद घेता येणार नाही. दरवर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यपार्ट्यांची परवानगी देण्यात येते. मात्र यंदा यावर प्रतिबंध घालण्यात आले असल्याने अशा पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी एकही अर्ज विभागाकडे आला नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

  -तर ५० हजारांचा दंड!
  कायद्याचे उल्लंघन करून पार्ट्या आयोजित करण्यात येत असल्यास आयोजकाला ३ ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा आणि २५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद या कायद्यात आहे. त्यामुळे ‘कायद्याचे पालन करा’ असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

  इथे करा तक्रार
  नागरिकांना तक्रार करायची असेल तर सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुंबई येथील आयुक्त कार्यालयात सुविधा केंद्र असणार आहे. तक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. तक्रारकर्त्याचे नाव कंट्रोल रूमपर्यंतच येईल, कारवाई पथकाला केवळ कुठे कारवाई करायची आहे, याचीच माहिती दिली जाणार आहे. नववर्षाचे स्वागत कायद्याचे पालन करून करा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी केले.

  टोल फ्री क्रमांक : १८००८३३३३३३

  व्हॉट्सअॅप क्रमांक : ८४२२००११३३

  अडी लाख मद्यसेवन परवाने

  डिसेंबर महिन्यात उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात परवानाधारक मद्यविक्रेत्यांना अडीच लाख मद्यसेवनाचे परवाने वितरित केले आहेत.