निवृत्त पोलीस निरीक्षकावर हॉटेल व्यवसायातून हल्ला; हल्ला करणाऱ्यास अटक

वानवडीत निवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्राथमिक तपासात हॉटेलच्या जागेच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

    वानवडीत निवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्राथमिक तपासात हॉटेलच्या जागेच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता वानवडी येथील काकडे मैदानावर घडली होती.

    याप्रकरणी प्रमोद काकडे (वय ४५, रा. वानवडी बाजार) याला अटक करण्यात आली असून, याप्रकरणी भादवी कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ईशा वजीर शेख (वय ५६, रा. ब्रम्हा आंगण सोसायटी, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वजीर शेख यांनी वानवडी येथील संविधान चौकात

    नेचर एग्रो टुरिझम हॉटेल सुरु केले आहे. यासाठी शेख यांनी दहा वर्षाच्या भाडेकराराने जागा घेतली आहे. काकडे याची तेथे जागा होती. मात्र भाडेकरार केला नव्हता. वजीर शेख यांनी काकाडे याच्याकडे भाडेकराराबाबत विचारणा केली. पण, काकडे भाडेकरार न करता शेख यांच्याकडून वारंवार पैसे घेत होता. आरोपी काकडे याला दारु पिण्याचे व्यसन आहे. शुक्रवारी रात्री आरोपी आणि शेख हे चर्चा करत असताना आरोपीने वाद घातला.

    काकडे याने त्याठिकाणी पडलेला दगड उचलून शेख यांच्यावर हल्ला केला. शेख यांच्या तोंडावर तीन ते चारवेळा दगड मारुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.