पिस्तुलच्या धाकाने व्यावसायिकाचे पैसे व कार लांबवली; वाजेवाडी चौफुला येथील घटना

वाजेवाडी (ता.शिरूर) येथील रस्त्याने जाणाऱ्या एका व्यावसायिकाला पिस्तूल व चाकूच्या धाकाने लुटत त्याची कारही लांबविल्याची घटना घडल्याने शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे वैभव उर्फ पप्पु सोमनाथ मांजरे याच्यासह दोन युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    शिक्रापूर : वाजेवाडी (ता.शिरूर) येथील रस्त्याने जाणाऱ्या एका व्यावसायिकाला पिस्तूल व चाकूच्या धाकाने लुटत त्याची कारही लांबविल्याची घटना घडल्याने शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे वैभव उर्फ पप्पु सोमनाथ मांजरे याच्यासह दोन युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    मांजरेवाडी (ता.शिरूर) येथील जमीन खरेदी विक्री व्यावसायिक आण्णा मांजरे हे त्यांच्या एमएच १२ आरटी ८४२८ या वॅगनरमधून वाजेवाडी चौफुला येथील गरूडझेप ॲकेडमी जवळून जात असताना तेथे असलेल्या वैभव उर्फ पप्पु सोमनाथ मांजरे व त्याच्या दोन साथीदारांनी आण्णा मांजरे यांना लिफ्ट मागितली. त्यावेळी आण्णा मांजरे यांना त्यांना कारमध्ये घेतले. त्यावेळी कारमध्ये बसलेल्या तिघांनी मांजरे यांना पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत आण्णा मांजरे यांना हाताने मारहाण करत ‘तू आम्हाला दहा लाख रुपये दे. नाहीतर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देऊन अण्णा मांजरे यांच्या खिशातील सात हजार रुपये काढून घेत त्यांना कारच्या बाहेर ढकलून देत त्यांची वॅगनर कार घेऊन तिघांनी पोबारा केला.

    याबाबत आण्णा बबन मांजरे (वय ४२ रा. मु. मांजरेवाडी वाजेवाडी पोस्ट करंदी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी वैभव उर्फ पप्पु सोमनाथ मांजरे, शुभम वाजे नाव सांगणारा अनोळखी इसम तसेच एक अनोळखी इसम या तिघांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.