वालचंदनगर परिसरात सशस्त्र दरोडा; घरमालक जखमी, महिलांना चाकूचा धाक दाखवून दागिने लुटले

गायकवाड यांच्या घरावर पडलेला दरोडा भयानक होता. गायकवाड यांच्यासह तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास चोरट्यासोबत झटापट सुरू होती, मात्र दरोडा घालणारे यशस्वी झाले.

  वालचंदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : वालचंदनगर (ता. इंदापूर) परिसरातील वालचंदनगर-जंक्शन या मुख्य रस्त्यालगत असलेल्या गायकवाडवस्ती येथील राजेंद्र भिकोबा गायकवाड यांच्या राहत्या घरी मध्यरात्री २ वाजता दरोडा पडला. या दरोड्यात चोरट्याने धारदार शस्त्राचा वापर करून धाक दाखवून घरातील रोख रक्कम १ लाख ५० हजार रुपये व १२ तोळे सोने लंपास करून जवळच असलेल्या वाघ वस्ती येथील मल्हारी वाघ यांच्या घरावर पहाटे ४ वाजता दरोडा घातला.

  या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी केलेल्या या सशस्त्र हल्ल्यात राजेंद्र गायकवाड यांच्या कपाळावर चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. घरातील महिलांना गळ्याला चाकू लावून गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात चोरटे यशस्वी झाले.

  वालचंदनगर येथील गायकवाडवस्तीवर व जवळच असलेल्या वाघ वस्तीवर एकाच रात्रीत दोन ठिकाणी दरोडा पडल्याने वालचंदनगर परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गायकवाड यांच्या घरावर पडलेला दरोडा भयानक होता. गायकवाड यांच्यासह तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास चोरट्यासोबत झटापट सुरू होती. मात्र, दरोडा घालणारे यशस्वी झाले.

  लागलीच सर्वत्र भ्रमणध्वनीचा वापर करून वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना जागे करण्यात आले. वालचंदनगर पोलिसांना या घटनेची माहिती आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गायकवाड वस्तीवर पहाटे तीन वाजता पोलिस पंचनामा करत असताना वाघ वस्तीवर मात्र चोरटे बिनधास्तपणे चोरी करत असल्याचे चित्र या परिसरात दिसून आले.

  वालचंदनगर पोलीसांनी गस्त वाढवून सुरक्षा यंत्रणा वाढवण्याची गरज असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे. याच वस्तीवर यापूर्वी दोन वेळा चोरी झाली आहे. मोटारसायकल, पाण्याच्या मोटारी अशा वस्तू पुर्वी चोरीला गेलेल्या आहेत. यावेळी पोलीस पथकासह पथक श्वान पथक दाखल झाले होते. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे, भिगवन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार , डि.वाय. मुजावार यांनी दरोड्याच्या घटनास्थळी भेट देवून तपासाला सुरूवात करण्यात आली. पुण्याहून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता गायकवाडवस्ती येथे चोरट्याचे ठसे घेण्यासाठीही पथक दाखल झाले होते.

  पुणे जिल्ह्यातील सर्वच सुत्रांनी हालचाल करून योग्य तपास सुरू करण्यात आलेला आहे. बारामती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी इंगळे यांनी घटनास्थळी पहाटेच भेट देऊन पाहणी केली. या दरोड्यात राजेंद्र गायकवाड यांच्या घरातील रोख रक्कम व १२ तोळे सोने असा ऐवज चोरट्याने लंपास केला. तर मल्हारी वाघ यांचे तीन तोळे सोने लंपास करण्यात आले आहे. या दरोड्याचा चार दिवसांत तपास करून दरोडेखोरावर कडक कारवाई करण्यात यावी, असे चोरट्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले राजेंद्र गायकवाड यांनी पोलिसांशी बोलताना सांगितले.