यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या सदस्यपदी रोहित पाटील; शरद पवार यांच्याकडून नियुक्ती

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील (Rohit Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबईच्या सदस्यपदी निवड झाली आहे. या प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आदेशानुसार रोहित पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

    तासगाव : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील (Rohit Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबईच्या सदस्यपदी निवड झाली आहे. या प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आदेशानुसार रोहित पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. दरम्यान, ही निवड करुन शरद पवार यांनी रोहित पाटील यांना आगामी काळात राज्याच्या राजकारणात उतरविण्याचे संकेत दिले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

    २५ नोव्हेंबर १९८४ ला यशंवतराव चव्हाण यांचे निधन झाले. निधनानंतर कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी चव्हाण यांचे अनुयायी व कार्यकर्ते एकत्र आले. त्यातूनच १७ सप्टेंबर, १९८५ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे धर्मनिरपेक्ष, पक्षनिरपेक्ष व्यासपीठ आहे. अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या प्रतिष्ठाणचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. महाराष्ट्राच्या जनमानसाला सचिंत करणार्‍या प्रश्नांचा खल करावा आणि या चर्चेतून कार्य करणारी माणसे तयार व्हावीत, ही प्रतिष्ठानची भूमिका आहे.

    राकट, कणखर आणि दगडांच्या देशाचा स्वाभिमान अभंग राहावा. हीच महाराष्ट्रातील जनमानसाची इच्छा आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा तीन दशकांचा प्रवास आकांक्षेच्या पूर्ततेसाठी सुरु आहे. आर. आर. पाटील हे राष्ट्रवादीचा चेहराच होते. शरद पवार यांनी त्यांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली. गेल्या दोन ते तीन वर्षांत रोहित पाटील यांनी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात राजकारणाबरोबर कोरोना काळात सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन झोकून देऊन काम केले. या कार्याची दखल घेत शरद पवार यांनी प्रतिष्ठाणचे सदस्य म्हणून नियुक्ती केली.

    राज्यातील राजकारण, समाजकारण तसेच शास्त्रज्ञ, कलावंत यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रतिष्ठाणचे सदस्य आहेत. आता रोहित पाटील हे प्रतिष्ठाणचे सर्वात तरुण असे सदस्य झाले आहेत.

    दरम्यान, विधानसभा निवडणुका अजूनही लांब असल्या तरी पुढच्या दोन तीन महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या निवडीकडे राजकीय दृष्ट्याही बघितले जात आहे. लवकरच रोहित पाटील यांना राष्ट्रवादीची एक मोठी अशी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.

    …हे तर माझे भाग्य : रोहित आर. आर. पाटील

    संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार असलेले स्व. यशवंतराव चव्हाण मराठी मनांचा मानबिंदू आहेत. त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी स्थापन केलेल्या प्रतिष्ठाणच्या सदस्यपदी शरद पवार यांनी माझी नियुक्ती केली, हे माझे भाग्य आहे. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गावे आणि शहरे यामधील सामाजिक अंतर दूर करण्यासाठी तसेच स्त्री सक्षमीकरणासाठी काम करणे. स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी करणार आहे.