रिपाइं पालिका निवडणूक ताकदीने लढणार; अशोक गायकवाड यांची घोषणा

सातारा शहराच्या विकासासह सातारकरांना सक्षम पर्याय देण्यासाठी नवीन चेहरे पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहे. कार्यकर्त्यांची ताज्या दमाची फौज निर्माण करणे हेच उद्दिष्ट असल्याची घोषणा रिपाइं (ए) चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड (Ashok Gaikwad) यांनी पत्रकार परिषदेत केली.

  सातारा : सातारा शहराच्या विकासासह सातारकरांना सक्षम पर्याय देण्यासाठी नवीन चेहरे पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहे. कार्यकर्त्यांची ताज्या दमाची फौज निर्माण करणे हेच उद्दिष्ट असल्याची घोषणा रिपाइं (ए) चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड (Ashok Gaikwad) यांनी पत्रकार परिषदेत केली.

  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि रिपाइं सातारा शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. गायकवाड पुढे म्हणाले, सातारा नगरपालिका निवडणूक रिपब्लिकन पार्टीच्या आदेशाप्रमाणे लढणार आहे. सातारकरांना सक्षम पर्याय आणि मूलभूत विकासकामांचा अजेंडा घेऊन निवडणुकांना सामोरे जाताना परिस्थिती सापेक्ष राजकीय आघाडी किंवा वेळ पडल्यास स्वबळावर लढाई हे सर्व पर्याय आम्हाला खुले असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

  महापुरुषांची विटंबना चुकीची

  महापुरुषांची विटंबना चुकीची आहे त्यामुळे विचाराने विचाराशी लढले पाहिजे. ज्यांनी हे कृत्य केले त्याचा निषेध. छत्रपतींची विटंबना होऊ नये याबाबत प्रशासनाने काळजी घ्यावी.  वादग्रस्त शिल्प अनावरण प्रकरणावर गायकवाड यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

  शहराध्यक्षपदी अक्षय कांबळे याची निवड

  पत्रकार परिषदेपूर्वी रिपाइं पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यामध्ये सातारा शहराध्यक्षपदी अक्षय कांबळे याची निवड झाली. अक्षय याचा पुष्पगुच्छ देऊन अशोक गायकवाड यांनी सत्कार केला. गायकवाड यांची केंद्रीय पर्यावरण समिती सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याचा शोध सुरू असल्याचे सूचक वक्तव्य गायकवाड यांनी केले.