रुपाली पाटील-ठोंबरे यांनी हाती बांधले ‘घड्याळ’; अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

मनसेच्या पुणे शहराच्या महिला उपाध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombre) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडल्यानंतर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

    मुंबई : मनसेच्या पुणे शहराच्या महिला उपाध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombre) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडल्यानंतर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (NCP Join) केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मनसेच्या अनेक महिला कार्यकर्त्यांही आहेत.

    कारभाराला कंटाळून मनसे सोडल्याचे जाहीर

    पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मनसेच्या पुण्यातील नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण मनसे सोडत असल्याचे रुपाली पाटील यांनी त्यापूर्वीच पत्रकार परिषदेत घेत जाहीर केले होते. आज त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसे सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ट्विट करत आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे हात नाहीत व पवार साहेबांसारखे झुकून नमस्कार करतील असे पाय दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलेय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार अशी पोस्ट करत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला टॅग केले होते.

    ठाकरे यांच्यावरील निष्ठा मनात कायम

    पाटील पक्षाच्या स्थापनेपासून गेली १४ वर्षे त्या मनसेसोबत होत्या. सन २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत त्या मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या. विधानसभेच्या सन २०१९ च्या निवडणुकीत त्यांची कसबा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्याऐवजी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना तिकिट देण्यात आल्याने त्या नाराज होत्या. मात्र, राज ठाकरे यांच्यासोबतच्या पक्षातील कालखंडाबाबत त्यांनी ऋण व्यक्त केले आहे. त्यांनी ठाकरे यांच्यावरील निष्ठा अन्य पक्षात काम करतानाही मनात कायम राहील, असे म्हटले आहे.