एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप मिटणार की नाही?; सकाळी 11 वाजता मोठा निर्णय होण्याची शक्यता

गेल्या 15 दिवसांपासून सुरु असलेला एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप मिटणार की नाही, हा प्रश्न अजूनही मिटलेला नाही. ऐतिहासिक पगारवाढीनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. त्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांनी बुधवारची रात्रही आझाद मैदानातच काढली. पण, आज यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. 

    मुंबई : गेल्या 15 दिवसांपासून सुरु असलेला एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप मिटणार की नाही, हा प्रश्न अजूनही मिटलेला नाही. ऐतिहासिक पगारवाढीनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. त्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांनी बुधवारची रात्रही आझाद मैदानातच काढली. पण, आज यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

    संपाबाबत गुरुवारी सकाळी 11 वाजता निर्णय घेऊ, अशी माहिती शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागून आहे.

    बुधवारी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांबाबत मोठी निर्णय घेतला. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्के वाढ करणार असल्याची घोषणा काल केली. मात्र, या ऐतिहासिक पगारवाढीनंतरही काही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केल्यानंतरही संपावर तोडगा काही निघाला नाही. सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी इन्सेटिव्ह योजना आणणार असल्याचं आश्वासनही सरकारकडून देण्यात आलंय. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत देण्याबाबत खबरदारी घेणार आसल्याचंही अनिल परबांकडून सांगण्यात आलं आहे.

    परिवहन मंत्री अनिल परब यांचं कर्मचाऱ्यांना आवाहन

    परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं, त्यानंतर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं. त्यानंतर पडळकर आणि खोत आझाद मैदानात पोहोचले. मात्र, तोपर्यंत अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली होती. त्यामुळे संपाबाबत गुरुवारी निर्णय घेऊ अशी माहिती सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी दिली.