सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी नवी अपडेट, सहाव्या आरोपीला हरियाणातून अटक

    अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील  गॅलक्सी अपार्टमेंटबाहेरील गोळीबार (Salman Khan House Firing Case) प्रकरणी रोज काही ना काही नवी माहिती समोर येत आहे. काही दिवसापुर्वी मुंबई गुन्हे शाखेने  राजस्थानमधून मोहम्मद चौधरी या पाचव्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं. त्याने शूटर सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांना पैसे दिले होते तसेच सलमान खानचं घर शोधण्यात मदत केली होती. आता या प्रकरणी आणखी एक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील सहाव्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने हरियाणातून अटक केली आहे.

    बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार केल्याप्रकरणी  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी हरयाणातील फतेहाबाद येथून आणखी एकाला अटक केली आहे. हरपाल सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो 37 वर्षांचा आहे. हरपाल सिंगने या प्रकरणात अटकेतील पाचव्या आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती आणि रेकी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. आरोपीला आज विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

    सलमानच्या घरावर भल्या पहाटे गोळीबार

    १४ एप्रिल रोजी रविवारी पहाटे 5 वाजताअभिनेता सलमान खानच्याॉ मुंबईतील  गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर दोघांनी गोळीबार केला. या प्रकरणी सुरुवातील दोन आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली. त्यानंतर दोन आरोपींना पंजाब मधून अटक करण्यात आली. त्यापैकी अनुज थापन या आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या केली. आता त्याच्या कोठडीतील मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत थापनच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.