रेशनिंगच्या मालाची काळ्या बाजाराने विक्री; टेम्पोसह पावणेदोन लाखाचा माल जप्त

रेशनिंगचा माल काळ्या बाजाराने विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात टेम्पो व १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : रेशनिंगचा माल काळ्या बाजाराने विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात टेम्पो व १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती अशी की, बारामती शहर पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, छोटा हत्ती (क्र .एम एच ४२, ए. क्यू ५८०५) यामधून स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी ठेवलेला तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी जात आहे. या बातमीवरून सदर वाहन पोलिसांनी तपासले. त्यावेळी त्यामध्ये एकूण ३० तांदळाची पोती मिळून आली.

    याबाबत चालक वैभव भारत दनाने (रा. तांदुळवाडी रोड बारामती) याच्याकडे बिलाबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणतेही बिल मिळाले नाही. त्यानंतर सदरचा माल किराणा दुकानदार वसंत सोमनाथ पोटी (रा. खाटीक गल्ली, बारामती) याचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्याकडे पोलिसांनी मालक खरेदीच्या पावत्या हजर करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांना सदरचा माल शासकीय बारदना बदलून खाजगी बारदानामध्ये भरलेला आहे व खुल्या बाजारात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याचे दाखवून विक्रीसाठी चाललेला होता, याची खात्री पटली.

    या मालाच्या खरेदीबाबत तेही कोणतेही पुरावा देऊ शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी हा टेम्पो व एक लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या आरोपींनी स्वस्त धान्य याबाबत असलेल्या शासनाच्या जिल्हाधिकारी यांच्या कंट्रोल ऑर्डरचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.

    याबाबत पुरवठा विभागाची मदत घेऊन सखोल चौकशी करण्यात येणार आहे. याप्रकारे शासकीय बारदाना बदलून धान्य खाजगी बारदाना भरून मार्केटमध्ये विकले जाते. याबाबत शोध घेऊन यापुढेही कारवाया करण्यात येणार आहेत. धान्याची बिले जर खोटी असतील तर त्याबाबत ही कारवाई करण्यात येणार आहे.