‘सह्याद्री व्याघ्र’मध्ये सांबराची शिकार; ५ जणांना ३ दिवसांची कोठडी

तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सांबराची शिकार केल्याप्रकरणी नाव गावचे रहिवासी असलेल्या ५ जणांना हेळवाक वन्यजीव विभागाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. 

  पाटण / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सांबराची शिकार केल्याप्रकरणी नाव गावचे रहिवासी असलेल्या ५ जणांना हेळवाक वन्यजीव विभागाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.

  याबाबत वन्यजीव विभागाने दिलेली माहिती अशी, नाव गावातील काही ग्रामस्थांनी सांबर या प्राण्यांची शिकार करून त्याचे मांस एका घरात शिजवत असल्याची गुप्त माहिती हेळवाकच्या वन्यजीव विभागास समजली. तातडीने वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी छापा टाकून ५ संशयितांना ताब्यात घेतले.

  या प्रकरणी सीताराम शेंडे, विशाल पवार, अशोक विचारे, महेंद्र जगताप, आनंद विचारे (सर्व रा. नाव, ता. पाटण) यांना अटक करून पाटण न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे यांनी दिली.

  स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सची गरज : रोहन भाटे

  दैनिक ‘नवराष्ट्र’शी बोलताना मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे म्हणाले, काही दिवसांपूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असलेल्या खासगी जागेत अभ्यासासाठी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये जंगलातील कोअर भागात बंदूक, विजेरी, हत्यारे घेऊन जाणारे शिकारी कॅमेराबद्ध झाले होते.

  संबंधितांची नावे उघड झाली आहेत. ते सर्रास शिकार करत असल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले. सदरचे संशयित हेळवाक, नेचल परिसरातील असल्याचे समजते आहे. त्यामुळे वन्यजीवांना धोका असून विशेषतः येथील वाघांच्या रक्षणासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सची (STPF) तातडीने मंजुरी होऊन नेमणूक होणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी आवश्यक आहे.