जिल्हा बँकेमुळे शेतकऱ्यांना मिळाला आर्थिक आधार

सातारा तालुक्यातील उरमोडी प्रकल्प लाभक्षेत्रातील शेंद्रे, अंबवडे खुर्द आणि नागठाणे या महसूल मंडलातील ४० गावातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर हस्तांतर हक्कामध्ये पुनर्वसन हस्तांतरबंदी शेरे नमूद होते. त्यामुळे या ४० गावातील शेतकऱ्यांना सदर जमिनी तारण, गहाण, दान, बक्षिस, विक्री, हक्कसोडपत्र आदी व्यवहार करण्यासाठी अडचण येत होती.

    सातारा : सातारा तालुक्यातील उरमोडी प्रकल्प लाभक्षेत्रातील शेंद्रे, अंबवडे खुर्द आणि नागठाणे या महसूल मंडलातील ४० गावातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर हस्तांतर हक्कामध्ये पुनर्वसन हस्तांतरबंदी शेरे नमूद होते. त्यामुळे या ४० गावातील शेतकऱ्यांना सदर जमिनी तारण, गहाण, दान, बक्षिस, विक्री, हक्कसोडपत्र आदी व्यवहार करण्यासाठी अडचण येत होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्या पाठपुराव्यामुळे शिक्के हटवले गेले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून जिल्हा बँकेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे, असे बँकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

    सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank) शाहूनगर शेंद्रे शाखेच्या वतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते डोळेगाव येथील अमित दत्तात्रय गोडसे यांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत कॅश क्रेडिटचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी शाखाप्रमुख जाफर बागवान, विकास अधिकारी अस्लम बागवान, तांत्रिक अधिकारी किरण भोसले, डोळेगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष गोडसे, माजी चेअरमन सोमनाथ गोडसे, व्हा. चेअरमन रविंद्र गोडसे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

    उरमोडी प्रकल्प लाभक्षेत्रातील शेंद्रे, नागठाणे आणि अंबवडे खुर्द या तीन महसूल मंडलातील ४० गावातील जमीनीच्या सातबारा उताऱ्यांवर शासनाने पुनर्वसन हस्तांतरबंदी शेरे मारले होते. त्यामुळे या ४० गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या स्वमालकीच्या जमिनीचे तारण, गहाण, दान, बक्षिस, विक्री, हक्कसोडपत्र आदी महत्वाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी विनाकारण शासकीय कार्यालयामध्ये खेटे मारावे लागत होते.

    सदर बंदी शेरे उठवण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी १७ नोव्हेंबर २०१८ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देऊन पाठपुरावा सुरु केला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता. हा प्रश्न सोडवून पुनर्वसन हस्तांतर बंदीचे कलम रद्द केल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांचे डोळेगाव, वेचले शिवाजीनगर, शेंद्रे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.