मराठी मतांची मोट बांधण्यासाठी सेना – मनसे आक्रमक; मराठी पाट्यांचा मुद्दा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिघऴला

मराठी दुकानांवरील मराठी पाट्यांचा मुद्दा आता पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिघळू लागला आहे. या भाषिक मुद्द्याच्या निमित्ताने मराठी मतांची मोट बांधण्यासाठी मराठी मतांचा आधार असलेल्या शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष आता आक्रमक झाले आहेत.

  मुंबई : मराठी दुकानांवरील मराठी पाट्यांचा मुद्दा आता पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिघळू लागला आहे. या भाषिक मुद्द्याच्या निमित्ताने मराठी मतांची मोट बांधण्यासाठी मराठी मतांचा आधार असलेल्या शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष आता आक्रमक झाले आहेत.

  दुकानांच्या पाट्या मराठीतून असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. मुळात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियमाच्या तरतुदीनुसार आस्थापनाचे नामफलक मराठी भाषेमध्ये देवनागरी लिपित असणे बंधनकारक आहे. दुकानांच्या पाट्यांवरील इतर भाषेच्या अक्षरापेक्षा मराठी भाषेचे अक्षरे ठळक असणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारास निरीक्षकांकडून प्रथम नोटीस दिली जाते. नियमांनुसार पाटी लावण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली जाते. मुदतीत नियमांचे पालन न झाल्यास संबंधित दुकानदार किंवा आस्थापन चालकाविरोधात कारवाई केली जाते. मात्र या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रीमंडळाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा मुद्दा आता कळीची मुद्दा ठरला आहे.

  मराठी पाट्या लावण्याची दुकानदारांना सक्ती करून मराठी मतांची व्होट बॅंक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न आघाडीतील तीन्ही पक्षांनी चालविल्याचे दिसून येत आहे. दुकानांवर प्रादेशिक भाषेत पाट्या लावणे हा त्या त्या राज्याचा अधिकार आहे. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा सरकारला अधिकार आहे, अशी भुमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे आपला मुद्दा हायजॅक होत असल्याची भिती मनसेला वाटू लागली असून मनसे आता पुन्हा मराठी पाट्यांवरून आक्रमक झाला आहे.

  मराठी टक्का विभागला जाणार

  सर्वच राजकीय पक्ष आता पालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या मतदार संघात आता सर्वच राजकीय उमेदवारी देतील. त्यामुळे मराठी मतांचा टक्का सर्वच राजकीय पक्षांत विभागला जाणार आहे. मात्र शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना मराठी भाषकांचा आघार आहे. त्यामुळे मतदारांचा आधार कायम ठेवण्यासाठी दुकानांच्या पाट्यांचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि मनसे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.