त्रिपुरात तातडीने CAPF च्या तुकड्या पाठवा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

त्रिपुरामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्ते त्यांच्या उमेदवारांसोबत गुंडगिरी करत आहेत. तसेच सर्व मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश करू देत नाहीत. मुखवटा घातलेल्या टोळ्या घरोघरी जाऊन मतदारांना घरी राहण्याचा इशारा देत आहेत'', असा आरोप तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय(एम) सह विरोधकांनी केला आहे.

    दिल्ली (Delhi) : त्रिपुरामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Tripura Local Bodies Election) होत आहेत. त्यासाठी आज सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पण, याठिकाणी भाजपचे (BJP) कार्यकर्ते मतदारांना त्रास देत आहेत आणि मतदानासाठी धमकावत आहेत, असे आरोप विरोधी पक्षाने केले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या दोन अतिरिक्त तुकड्या त्रिपुरामध्ये शक्य तितक्या लवकर पाठवा, असे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत.

    ”त्रिपुरामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्ते त्यांच्या उमेदवारांसोबत गुंडगिरी करत आहेत. तसेच सर्व मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश करू देत नाहीत. मुखवटा घातलेल्या टोळ्या घरोघरी जाऊन मतदारांना घरी राहण्याचा इशारा देत आहेत”, असा आरोप तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय(एम) सह विरोधकांनी केला आहे. तृणमूलने ट्विट केलेल्या एका व्हिडिओमध्ये काळ्या शर्ट घातलेला एक पुरुष एका महिलेकडून बळजबरीने मतदान करवून घेतो, असं दिसतंय. हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून आता न्यायालयाने त्यावर आदेश दिले आहेत.

    केंद्रीय गृहमंत्रालयाने सीएपीएफच्या च्या 2 अतिरिक्त तुकड्या शक्य तितक्या लवकर तैनात कराव्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे कुठलाही व्यत्यय न येता मतदान होऊ शकेल. तसेच 28 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईपर्यंत हे कर्मचारी तैनात राहतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.