वरिष्ठ अधिकाऱ्यासह ४३ कर्मचारी कारवाईच्या कचाट्यात; विभागप्रमुखांना नोटीसा जारी

गेल्या काही दिवसांपासून सीईओ स्वामी यांनी विविध आढावा बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हा परिषद व जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त व कामकाजात सुधारणा करण्यासंदर्भात सुचना दिलेल्या होत्या व कारवाईचा इशारा देखील दिलेला होता.

  सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह ४३ कर्मचाऱ्याना शिस्तभंग प्रकरणी नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहील्याने कर्मचारी विनावेतन कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत.

  शुक्रवारी सीईओ दिलीप स्वामी यांनी पाहणी केली. ग्रामपंचायत १, शिक्षण प्राथमिक ४, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील ६, बांधकाम क्रमांक २ मधील ५, आरोग्य १२, समाजकल्याण विभागातील ३, शिक्षण माध्यमिक १, कृषी विभाग १, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग 1, अर्थ विभाग ५, बांधकाम विभाग क्रमांक १ मधील ४ असे एकूण ४३ अधिकारी व कर्मचारी भेटीवेळी अनुपस्थित आढळून आले आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी नोटीस देऊन जाब विचारला आहे.

  काही दिवसापुर्वी अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी विविध कार्यालयाची पाहणी केली होती. अधिकारी कर्मचारी गैरहजर राहत असल्याची बाब सीईओ स्वामी यांना निर्देशनास आणली होती.

  सीईओ स्वामी यांचा कारवाईचा धडाका

  शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास, प्राथमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व माध्यमिक शिक्षण विभागात सीईओ स्वामी अचानकपणे भेट देऊन पाहणी केली.

  कर्मचारी व अधिकारी यांनी ९:४५ वाजता कार्यालयात हजर असले पाहिजे. परंतु १०:१५ वाजले तरी काही अधिकारी व कर्मचारी अद्याप कार्यालयात हजर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे सीईओ स्वामी यांनी खडेबोल सुनावले. त्यांच्याबरोबर असलेल्या सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप यांना सर्व विभागांचे हजेरी पत्रक ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.

  गेल्या काही दिवसांपासून सीईओ स्वामी यांनी विविध आढावा बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हा परिषद व जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त व कामकाजात सुधारणा करण्यासंदर्भात सुचना दिलेल्या होत्या व कारवाईचा इशारा देखील दिलेला होता. परंतु काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तनात बदल होताना दिसत नसल्याने कारवाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.