ओमायक्रॉनबाधित रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड

सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू नये म्हणून आरोग्य यंत्रणा प्रचंड सतर्क झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा रुग्णालयात १४ बेड्सचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण (Dr. Subhash Chavan) यांनी ही माहिती दिली.

  सातारा : सातारा जिल्ह्यात (Satara District Hospital) ओमायक्रॉनचा (Omicron) संसर्ग वाढू नये म्हणून आरोग्य यंत्रणा प्रचंड सतर्क झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा रुग्णालयात १४ बेड्सचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण (Dr. Subhash Chavan) यांनी ही माहिती दिली.

  आरटीपीसीआर चाचणीची प्रक्रिया

  जगभरातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्य शासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यानुसार संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने परदेशातून आलेल्या नागरिकांचे होम आयसोलेशन व आरटीपीसीआर चाचणीवर भर दिला जात आहे.

  गेल्या २० दिवसांत जिल्ह्यामध्ये विविध देशांतून ५०३ नागरिक आले आहेत. या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच आरेाग्य विभागाकडून या नागरिकांच्या गृहविलगीकरणाकडे लक्ष ठेवले जात आहे.

  फलटणमध्ये तिघे पॉझिटिव्ह

  या प्रक्रियेच्या माध्यमातूनच फलटण तालुक्यात युगांडा या देशातून आलेल्या नागरिकांची तपासणी झाली. कोरेाना पॉझिटिव्ह आल्यानंतर व्हायरस कोणता आहे, याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. त्यामध्ये तीन नागरिकांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले. हे नागरिक पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

  फलटणचे बाधित आल्यानंतर झालेल्या इतर नागरिकांच्या तपासणीत परदेशातून आलेले आणखी काही जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली असण्याचा संशय वैद्यकीय अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार संबंधितांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.