रिक्षा व दुचाकी चोरणाऱ्या सराईतांना बेड्या; वाहने जप्त, समर्थ पोलिसांची कारवाई

  पुणे : शहरातील विविध भागांतून तीनचाकी रिक्षा तसेच दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईतांना समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दोन रिक्षा तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

  समर्थ पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून तत्काळ कारवाई
  आलीम अल्ताफ पालकर (वय २६, रा. कोंढवा) व अक्तर हसन शेख (वय २४, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेली तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, उपनिरीक्षक सुनिल रणदिवे व त्यांच्या पथकाने केली आहे.

  दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरट्यांचा शोध

  शहरात वाहन चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दुचाकींसोबतच चार चाकींवर देखील चोरट्यांकडून डल्ला मारला जात आहे. यादरम्यान, समर्थ पोलीस दाखल असलेल्या एका रिक्षा चोरीचा तपास करत होते. तेव्हा परिसरातील जवळपास दीडशे सीसीटीव्ही तपासले. तसेच, चोरट्यांचा माग काढण्यास सुरूवात केली.

  पुढील तपास पोलिसांकडून सुरू

  त्यावेळी पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, रहीम शेख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरलेली रिक्षा मंगळवार पेठेतील बारणे रोडवर आहे. त्यानूसार, पथकाने याठिकाणी सापळा रचला. पण, पोलीस आल्याचे संशय दोघे रिक्षातून बाहेर पडत पळाले. पोलिसांनी मात्र, काही अंतर त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी रिक्षा चोरीची असल्याची कबूली दिली. सखोल तपासात या दोघांकडून आणखी एक रिक्षा चोरीचा व एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.