पराभवानंतर शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

    सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाला, असा आरोप शिंदे समर्थकांनी करत राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दगडफेक केली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    दरम्यान, या पराभवामागे मोठं कारस्थान असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. शिंदे म्हणाले की,’मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की मला ज्यांनी उभा केलं त्या पक्षाच्या कार्यालयाविरोधात जी भूमिका घेतलीय ती योग्य नाही. मी पवार साहेबांसह सर्वांची माफी मागतो. भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर मी माफी मागतो. माझ्याकडून कोणत्याही प्रकारे असं नाही होणार, मी पक्षासाठी जीव देईन, माझ्यासाठी कार्यकर्त्यांनी अशी कोणत्याही प्रकारची भूमिका घेऊ नये.’

    दरम्यान, मी एका मताने पराभूत झालो, तो स्वीकारतो, माझ्यासाठी पवारसाहेब, अजितदादा यांनी प्रयत्न केले. माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असेही शिंदे म्हणाले.