तृतीयपंथींना हक्काचा निवारा, काँग्रेस खासदार स्वखर्चातून बांधून देणार घरं!

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी तृतीयपंथीयांविषयीची समाजाची दृष्टी बदलण्याकरिता पुढाकार घेतला आहे. तृतीयपंथांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी बाळू धानोरकर पुढे आले आहेत.

  चंद्रपूर (Chandrapur) : तृतीयपंथीयांचा आशीर्वाद फार शुभ असतो, असं मानलं जातं. एकीकडे त्यांचा आशीर्वाद घेणारा हाच समाज दुसरीकडे तृतीयपंथीयाकडे हीन भावनेने बघत असते. त्यांचे दु:ख, वेदना शब्दात न सामावणारे असते. हे सगळं डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी समाजाची दृष्टी बदलण्याकरिता पुढाकार घेतला आहे. तृतीयपंथांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी खा. बाळू धानोरकर पुढे आले आहेत. स्वखर्चातून त्यांनी काही तृतीयपंथीयांना घरं बांधून देण्याचा विडा उचलला आहे. नुकतेच एका घराचे भूमीपूजनही धानोरकरांच्या हस्ते पार पडले आहे.

  खासदार बाळू धानोरकर यांनी स्वखर्चातून चंद्रपूर येथील रय्यतवारी कॉलनी येथे तृतीयपंथी बांधवांना घर बांधून देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार धानोरकरांच्या हस्ते एका तृतीयपंथीयाच्या घराचं भूमीपूजन आज उरकलं. खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी समाजात वंचित घटक असलेल्या तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे.

  समाजात तृतीयपंथीयांना सन्मान मिळावा यासाठी धानोरकरांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. मिस्टर आणि मिसेस धानोरकर दाम्पत्य तृतीयपंथांना हक्काचा निवारा देण्यासाठी पुढे सरसावलेत. स्वखर्चातून तृतीयपंथीयांना घर बांधून देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

  खासदार धानोरकर यांच्या उपक्रमाचं आणि निर्धाराचं चंद्रपूर जिल्ह्यात कौतुक होतंय, तसंच त्यांच्या उपक्रमाची राज्यातही चर्चा होतीये. खासदार धानोरकरांच्या या उपक्रमाने तृतीयपंथीयाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल, अशी आशा व्यक्त केली जातीये.

  कोण आहेत बाळू धानोरकर ?
  — महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेसचे खासदार
  — लोकसभा निवडणुकीआधी त्यांंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  — दुसऱ्या मोदी लाटेत चंद्रपूर जिल्ह्यातून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय
  — २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ चारली.
  — काँग्रेसचे खासदार होण्यापूर्वी ते शिवसेनेचे आमदार होते.
  — काँग्रेसचे आक्रमक खासदार म्हणून ओळख.