उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवसैनिकानेच आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. दत्तात्रय नारायण वऱ्हाडे असं या 65 वर्षीय शिवसैनिकाचे नाव आहे.

  उस्मानाबाद : जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवसैनिकानेच आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. दत्तात्रय नारायण वऱ्हाडे असं या 65 वर्षीय शिवसैनिकाचे नाव आहे. वऱ्हाडे यांनी 1984 साली उस्मानाबाद शहरात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती. अत्यंत सामान्य राहणी, तंगीची आर्थिक परिस्थिती असतानाही मैलोन् मैल पायी आणि सायकलवर स्वारी करत त्यांनी शिवसेनेचा प्रचार केला.

  दरम्यान काही दिवसांपूर्वीच दत्तात्रय हे अत्यंत हलाखीत जीवन जगत असल्याचे वृत्त माध्यमांतून झळकले होते. मात्र आज पहाटे 4 जानेवारी रोजी त्यांनी शिवसेनेच्या भगव्यानंच गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली. उस्मानाबादेतील त्यांच्या घराशेजारील झाडाला भगव्याच्या सहाय्यानेच त्यांनी गळफास घेतला.

  उस्मानाबाद मध्ये पहिली शिवसेनेची शाखा स्थापन केली होती

  कोणतीही निवडणूक असली तरी शिवसेनेच्या प्रचारासाठी कायम पायाला भिंगरी लावून फिरणारे कट्टर शिवसैनिक अशी दत्तात्रय यांची प्रतिमा होती. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे तर त्यांच्यासाठी दैवतच होते. बाळासाहेब ठाकरे यांचा निस्सीम भक्त अशीच त्यांची परिसरात ओळख होती. 1984 साली जिल्ह्यातील पहिली शिवसेनेची शाखा त्यांनी उस्मानाबाद शहरात स्थापन केली. ही शाखा स्थापन करतानाही, त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यावेळीदेखील उधार पैसे घेऊन त्यांनी शिवसेनेची शाखा स्थापन केली होती.

  आत्महत्या केल्याने राजकीय हळहळ व्यक्त

  दत्तात्रय वऱ्हाडे हे चपाच्या टपरीवरच उदरनिर्वाह करायचे. पण ज्यावेळी निवडणुका असतील तेव्हा ते टपरी बंद करून प्रचारकार्यात लागायचे. वऱ्हाडे यांना 4 मुली आणि 2 मुले आहेत. मुलींची लग्न झाली. मुलांनी अर्धवट शिक्षण सोडून कामधंदा सुरु केला. कुटुंबाची वाताहत होत असताना फक्त शिवसेनेवर श्रद्धा ठेवून भगव्यासाठीच आयुष्य वेचलेल्या या शिवसैनिकाने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने राजकीय हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनीच स्थापन केलेल्या उस्मानाबादेतील शिवसेनेतून अनेक कार्यकर्ते मोठे झाले, आमदार, खासदार झाले, पण या शिवसैनिकाची यामुळे थोडीही भरभराट झाली नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे.