ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा झेंडा; पाटण तालुक्यातील चित्र

पाटण तालुक्यात गत सहा महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बहुमत सिध्द केले होते. तर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून व बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये शिवसेनेने मुसंडी मारली आहे.

    पाटण : पाटण तालुक्यात गत सहा महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) निवडणुकीमध्ये शिवसेनेने बहुमत सिध्द केले होते. तर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून व बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये शिवसेनेने मुसंडी मारली आहे.

    पाटण तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतीमधील १४० रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार या पोटनिवडणुकांमध्ये ३२ ठिकाणी एकही अर्ज न दाखल झाल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. ३८ ठिकाणी ३९ बिनविरोध सदस्य झाले तर प्रत्यक्ष १६ ठिकाणी ग्रामपंचायतींच्या १७ रिक्त जागांसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान होऊन या निवडणुका पार पडल्या.

    पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध व निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, यशराज देसाई, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, व्हा. चेअरमन राजाराम पाटील, शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, सुग्रा बशीर खोंदू, पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, सुरेश पानस्कर, संतोष गिरी, सीमा मोरे, निर्मला देसाई, सुभद्रा शिरवाडकर यांनी अभिनंदन केले.

    ३१ ग्रामपंचायतीमध्ये ३२ ग्रामपंचायत सदस्य सेनेचे

    बिनविरोध व पोटनिवडणूक झालेल्या ४७ ग्रामपंचायतींमध्ये बोडकेवाडी, नहिंबे चिरंबे, भूडकेवाडी, जमदाडवाडी, टेळेवाडी, जरेवाडी, कोदळ पुनर्वसन, कळकेवाडी, रामिष्टेवाडी, शितपवाडी, सातर, पाळशी, पाणेरी, तामिणे, पाचगणी, मस्करवाडी, सुतारवाडी, डोंगळेवाडी, खोणोली, जाधववाडी, मान्याचीवाडी, माथणेवाडी, चाळकेवाडी, कळंबे, नाणेल, गाडखोप, खिवशी, वेखंडवाडी, काळोली, दुसाळे, मोरेवाडी (कुठरे) या ३१ ग्रामपंचायतीमध्ये ३२ ग्रामपंचायत सदस्य हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेतृत्व मानणारे आहेत.