शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक सरकारचा निषेध; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुतळ्याचे दहन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने कर्नाटक भाजप सरकारचा जोरदार शब्दात निषेध करत कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आला.

  मिरज : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने कर्नाटक भाजप सरकारचा जोरदार शब्दात निषेध करत कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आला. शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख शंभुराजे काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

  महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जाऊन कर्नाटकच्या भाजप सरकारचा निषेध करण्याचे नियोजन पूर्व नियोजित होते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस व कर्नाटक पोलीसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. अगदी सकाळी दहा वाजल्यापासून दोन्ही ही राज्याच्या पोलीस यंत्रणा तयारीत होत्या. आंदोलनाच्या सुरुवातीस पोलीस व शिवसैनिकांच्यात थोडीशी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शिवसैनिकांनी कर्नाटकातील भाजप सरकारचा जोरदार शब्दात निषेध करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा दहन केला. यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय ! हा आवाज कोणाचा हा आवाज शिवसेनेचा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी वाहतूक थोड्या काळासाठी थांबवली होती. आंदोलन झाल्यानंतर वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.

  यावेळी सांगली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभुराजे काटकर, महिला जिल्हा संघटक सुजाता इंगळे, मिरज तालुका शिवसेनेचे प्रमुख विशालसिंह रजपूत, मिरज विधानसभा क्षेत्राचे प्रमुख तानाजी सातपुते, मिरज शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे,पप्पू शिंदे, गजानन मोरे, बाळासाहेब मगदूम, सतिश नलवडे, बाळासाहेब मगदूम, प्रदिप जाधव, बबन कोळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  दरम्यान, शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत मैगुरे आणि सहकारी कार्यकर्त्यांनी मंगळवारी मिरजेत शिवसैनिकांनी कर्नाटकाच्या ध्वजाची होळी करुन निषेध व्यक्त केला.

  यावेळी शंभोराज काटकर म्हणाले, पुण्यामध्ये येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवाजी महाराजांना वंदन करतात. उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवरायांचे गुणगान गातात आणि कर्नाटकचे हे दोन तोंडी म्हमडुळ सरकार अमित शाह यांच्या आदेशाने कर्नाटकात दंगली घडवतात. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रात दंगली घडविण्याचा मास्टरमाईंड अमित शहा आहेत. मराठी भाषिकांवर अत्याचार करायचा. मराठी शाळा बंद पाडायच्या. सुप्रीम कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्यास सांगितले असतानासुद्धा मराठीची गळचेपी करायची मराठी पाट्या बदलायच्या कन्नड सक्ती करायची असे उद्योग कर्नाटक सरकार करतेय. मराठी माणूस आणि सीमावासीय मराठी भाषिक हा शिवसेनेचा आत्मा आहे. आमच्या आत्मसन्मानाबरोबर खेळाल तर याद राखा, बंगलोरच्या सदाशिवनगरमध्ये घुसून छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर दुग्धाभिषेक केला जाईल आणि कर्नाटक सरकारला चांगलाच धडा शिकवला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

  महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसेनेच्या वतीने आंदोलन होणार असल्याने महाराष्ट्र पोलीस व कर्नाटक पोलीसांनी यंत्रणा सज्ज ठेवली होती. आंदोलनस्थळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेतली होती. तसेच कर्नाटक पोलीसांनी कर्नाटकातील वाहतूक तर महाराष्ट्र पोलीसांनी महाराष्ट्रातील वाहतूक काही काळ थांबवली होती. यावेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.