‘शिंदेंचा पक्ष फक्त दोन-चार महिन्यांचा’; अंबादास दानवे यांचा घणाघात

भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाला ताटाखालचे मांजर बनवून ठेवले आहे असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.

    मुंबई – शिवसेना शिंदे गटाने अचानक हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा जाहीर केलेला उमेदवार बदलला. हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द करत हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममध्ये उमेदवारी जाहीर केली. नाराज भाजप नेत्यांनी शिंदे गटावर दबाव आणला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगत आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या या निर्णयावरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला असून ‘भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाला ताटाखालचे मांजर बनवून ठेवले आहे” असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.

    अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, “शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेतृत्व करत होते, त्यावेळेस आमचे उमेदवार बदलण्याची हिंमत भाजपाने कधीही केली नाही. जागावाटप हे पक्षाचे होत असते त्यांनी त्यांचा-त्यांचा उमेदवार ठरवायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असते, परंतु भाजपाने आता ही नवीनच नीती अवलंबली आहे,” असे अंबादास दानवे म्हणाले. “शिवसेनेत कुणाची गळचेपी होत नाही. शिवसेनेत लोकशाही आहे. पण आज भाजपाकडून शिंदे गटाचे उमेदवार ज्यापद्धतीने बदलले जात आहेत, त्यावरून शिंदे गटावर कुणाचे नियंत्रण आहे? हे दिसून येते. शिंदे गटाचे नेते सांगतात की, आम्ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाढायला चाललो आहोत. पण त्यांचे कोणतेही स्वतंत्र अस्तित्व नाही. हे यातून स्पष्ट होते”, अशीही टीका अंबादास दानवे यांनी केली.

    शिंदे गट दोन-चार महिन्यापुरता

    “शिंदे गटाला जवळपास घेरलेले आहेच. कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. हातकंणगलेमदून धैर्यशील माने यांना विरोध सुरू आहे. ठाणे आणि कल्याण सहजासहजी मिळत नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मिळत नाही, रायगड मागण्याचा प्रयत्न केला. पण यात त्यांना यश मिळाले नाही. शिंदे गट आता दोन-चार महिन्यांचा पक्ष आहे. विधानसभेपर्यंत हा पक्ष राहिल, असे मला वाटत नाही”, असे मोठे विधान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.