शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने १०० कोटींचा घोटाळा केलाय; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला आहे. आणि त्यांची तक्रार मी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. 

    औरंगाबाद : शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला आहे. आणि त्यांची तक्रार मी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.

    दरम्यान यावेळी सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आशीर्वादाने अनिल देशमुख पुन्हा एकदा गृहमंत्री पदावर बसतील अशी त्यांना आशा आहे. मात्र आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही. असे म्हणून सोमय्या यांनी ठाकरे आणि पवार यांच्यावर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी शरद पवार म्हणाले होते, अनिल देशमुख यांना प्रत्येक क्षणाची शिक्षा दिली जाईल. पण त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी खुद्द स्वतःच जेलमध्ये टाकले आहे. असा आरोप सोमय्यांनी केला.

    अर्जुन खोतकर यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला

    सध्या २३ जणांची चौकशी सुरू असल्याचा खुलासा देखील त्यांनी केला आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळी यांची नावे त्यांनी जाहीर केली आहेत. अर्जुन खोतकर यांच्या विषयी बोलताना पुढे ते म्हणाले, आज मी अर्जुन खोतकर यांचे नाव घेत आहे. अर्जुन खोतकर यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला आहे. आणि याची तक्रार आयकर विभाग आणि इडीकडे केलेली आहे. रामनगर येथील कारखाना त्यांनी चुकीच्या पद्धतीने फसवून मिळवला आहे. शहरातील मुळे आणि तापडिया यांच्याकडे ज्या धाडी पडल्या आहेत त्या खोतकर यांच्याशी संबंधित आहेत. असाही दावा यावेळी सोमय्या यांनी केला.