‘नक्की लाज कशाची वाटते ते सांगून टाका’; शिवेंद्रसिंहराजे यांचा उदयनराजे यांच्यावर निशाणा

भावनिक डायलॉगबाजी करून सातारकरांना आपले म्हणायचे आणि निवडणूका झाल्यावर साताऱ्यातून गायब व्हायचे हे असले यांचे उद्योग आहे. सातारकरांनी या भूलथापांना बळी पडू नये. याचे हे प्रेम मनाचे नाही तर मताचे आहे. त्यामुळे यांना योग्य ते उत्तर देण्याची वेळ आली आहे. 

  सातारा : निवडणूकजवळ आली की हे रडतात कुणाचा मुका घेतात. मात्र, ही त्यांची केवळ नौटंकी आहे. सातारकरांनी या नाटकांना भूलू नये. लाज वाटणाऱ्यांना नक्की कशाची लाज वाटली हे सुद्धा एकदा कळू द्या, असे टीकास्त्र आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता केली.

  गोडोली नाका ते अजंठा हॉटेल परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नवीन पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी झाला. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी नागरिकांशी संवाद साधताना सातारा विकास आघाडीच्या प्रशासकीय इमारत उद्घाटनाची चांगलीच खिल्ली उडविली. ते म्हणाले, ज्या इमारतीला ना निधी ना तांत्रिक मंजूरी ना प्रशासकीय सोपस्कार अशा उद्‌घाटनाचे नारळ फोडून केवळ आम्ही काही तरी करतोय याचा पोकळ डंका पिटला जात आहे. सध्या पालिका निवडणुकांचे वारे वहात आहे. सत्तारूढ आघाडीला मतांची गरज असल्याने दुसऱ्यांच्या कामांचा नारळ फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करित आहेत. ज्यांना सातत्याने लाज वाटते त्यांनी नक्की कशाची लाज वाटते हे सातारकरांना सांगून टाकावे. कधी हे रडतील कधी तरी कोणाचा मुका घेतील ‘ हे करण्यापेक्षा साताऱ्याचा विकास केला असता तर अधिक बरे झाले असते.

  भावनिक डायलॉगबाजी करून सातारकरांना आपले म्हणायचे आणि निवडणूका झाल्यावर साताऱ्यातून गायब व्हायचे हे असले यांचे उद्योग आहे. सातारकरांनी या भूलथापांना बळी पडू नये. याचे हे प्रेम मनाचे नाही तर मताचे आहे. त्यामुळे यांना योग्य ते उत्तर देण्याची वेळ आली आहे.

  पंचायत समितीच्या शौचालयाची दारे पाहणारे केवळ बोलतात. पण बीडीओकडे कधी तक्रार अर्ज करत नाही, अशी फुकाची पोपटपंची करणारे काळ कोटवाले पालिकेच्या बाहेरच ठेवा असा सणसणीत टोला शिवेंद्र सिंहराजे यांनी ॲड. दत्ता बनकर यांना लगाविला.

  विलासपूर व संभाजीनगर येथील पाणी प्रश्न या पाईपलाईनच्या कामाने निश्चित सुटेल असे आश्वासन त्यांनी दिले.

  आमदारांच्या हाती जेसीबीचे स्टेअरिंग

  आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी शनिवारी प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन विकास कामांसंदर्भात गोडोलीचे नगरसेवक शेखर मोरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण, उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे यांनी केवळ या कामाचे उद्घाटनच केले नाही तर चक्क जेसीबीवर स्वार होऊन त्याचे सुकाणू हातात घेतले. या कामाची पहिली जलवाहिनी शिवेंद्रसिंहराजे यांनी जेसीबीने उचलली.