शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना लगावला टोला; म्हणाले…

खासदार म्हणतात मी घरफोड्या केल्या पण मी कोणाचे घर फोडले हे खासदारांनी सांगावे, माझ्यावर घरफोडीचा कोठेही गुन्हा दाखल नाही. दर पंचवार्षिकला चार महिने आधी नारळ फोडायचे उद्घाटने करायची ? आणि अजिंक्य उद्योगासंदर्भात ठरलेली कॅसेट वाजवायची. खासदारांनी अजिंक्यतारा बँकेची माहिती घेऊन मगच बोलावे.

    सातारा : वय वाढले तरी आमची बुध्दी लहान मुलापेक्षा कमी असे म्हणणाऱ्या खासदारांच्या बुध्दीच्या अचाट लीला आहेत. लोकांमधून लोकसभेत निवडून खासदार राजीनामा देऊन मागच्या दाराने राज्यसभेत खासदार मग यांच्या बुध्दीला काय म्हणावे? असा उपरोधिक प्रति टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला.

    कास येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी त्यांची बुध्दी लहान मुलांपेक्षा कमी असल्याची टीका केली होती. या टीकेचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी सोमवारी सुरूची निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन जोरदार समाचार घेतला.

    शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले की, खासदार म्हणतात मी घरफोड्या केल्या पण मी कोणाचे घर फोडले हे खासदारांनी सांगावे, माझ्यावर घरफोडीचा कोठेही गुन्हा दाखल नाही. दर पंचवार्षिकला चार महिने आधी नारळ फोडायचे उद्घाटने करायची ? आणि अजिंक्य उद्योगासंदर्भात ठरलेली कॅसेट वाजवायची. खासदारांनी अजिंक्यतारा बँकेची माहिती घेऊन मगच बोलावे. अजिंक्यतारा बँक रिझर्व बँकेच्या सूचनेनुसार सक्षम बँकेत विलिन करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठेवीदारांचे पैसे बुडाले नाही. मग मी कोणाचे घर फोडले याचे उत्तर खासदारांनी द्यावे असा सवाल शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. माझी बुद्धी छोटीच राहिली आहे वाढ झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे खासदार यांची बुद्धी मोठं आहे याचं आविष्कार सर्वांना माहीत आहे. मी फक्त म्हटले की निवडणुका आल्या की नारळ फोडायचं पण पालिकेस लुटायचे एवढंच यांचे काम आहे.

    आपल्या अफाट बुद्धीतून भुयारी गटर योजना का पूर्ण झाली नाही. बायोमायनिंगचे पैसे कुठे गेले एकूणच प्रत्येकातून पैसे काढणे हाच पराक्रम दिसत आहे. स्थायीचे सभेत 400 विषय निवडणुकीच्या तोंडावर घेणं म्हणजे केवळ पालिकेस लुटण्याचाच प्रकार आहे. या गैरप्रकारांना नगर विकास आघाडीने वेळोवेळी विरोध केला. हा विरोध करताना आपण कुठेही कमी पडलो नाही. आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा यांनी सुध्दा इर्षेतून भाजपमध्ये येण्याची हौस पूर्ण केली. पुढच्या दाराने लोकसभेला लोकांमधून निवडून गेलेले उदयनराजे राजीनामा देऊन मागच्या दाराने राज्यसभेचे खासदार झाले. तेव्हा यांच्या मोठ्या व उंची असणाऱ्या बुध्दीला काय म्हणावे, असा टोला शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांना लगावला.