‘मराठा आरक्षणाची फेब्रुवारीत घोषणा…; शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचे सूचक वक्तव्य

. मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यातील अधिवेशनात मराठा आरक्षणाची घोषणा होईल, अशी महत्त्वाची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.

    मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन आंदोलन सुरु झाले आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी  आरक्षणासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर ‘चलो मुंबई’चा नारा देत, मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार केला. त्यांनी मुंबईमध्ये उपोषण करु नये यासाठी सरकारमधून प्रयत्न सुरु आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेचे (शिंदे गट) (ShivSena) प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यातील अधिवेशनात मराठा आरक्षणाची घोषणा होईल, अशी महत्त्वाची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.

    शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना विरोधकांवर देखील निशाणा साधला. शिरसाट म्हणाले, “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, त्यानुसार ते मुंबईचे दिशेने येतात. आपण ज्या कारणाने आंदोलन करतो, जी मागणी आहे त्यावर सरकारने त्यांना सकारात्मक घेतले की नाही हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. चाळीस वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलनात आता मुख्यमंत्र्यांपासून सर्वच सहभागी झालेले आहेत. आता एकनाथ शिंदे जे करत आहेत ते इतर कुणीही केलेले नाही. पण तरीही त्यांना अडचणीत कसं आणायचं हा काही लोकांचा डाव आहे, काही लोकांना आंदोलन चिघळायचं आहे ते जरांगे यांनी समजून घ्यायला हवं” असे सूचक वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले.

    पुढे ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 तास आपल्या कामात आहेत. ते आरक्षणाच्या मुद्द्यावर काम करत आहेत. कुणाच्याही टीका-टिप्पणीमुळे ते काम थांबवत नाहीत. मुख्यमंत्र्यांचं अहोरात्र काम सुरु आहे. त्यांचं काम तसंच पुढे चालत राहणार. आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की, इतर लोक आपल्या आंदोलनाचा फायदा घेणार नाहीत, याची काळजी घ्या. तुम्हाला आरक्षण फेब्रुवारी महिन्यात अधिवेशन काळात मिळणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे. याबाबत चिंता करण्याचं कारण नाही” असा विश्वास संजय शिरसाट यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत व्यक्त केला. त्यामुळे आरक्षण येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

    संजय शिरसाट यांनी विरोधकांवर देखील गंभीर आरोप केले. शिरसाट म्हणाले, “सरकार आणि आंदोलन कर्त्यांमध्ये कुठेतरी वाद व्हावा, ही अनेकांची भूमिका आहे. यासाठी सगळेजण डोळे लावून बसलेले आहेत. पण एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे सर्वांना पोटदुखी होत आहे. शरद पवारांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. शरद पवार स्वत: आरोपी आहेत. त्यांनीच मराठा समाजाला झुलवत ठेवलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षणासाठी काम करत आहेत. त्यामुळे कालचा पोरगा मला ओव्हरटेक करतोय ही अडचण झालीय. त्यामुळे त्यांची ही बोंबाबोंब सुरू आहे”, अशी घणाघाती टीका संजय शिरसाट यांनी शरद पवारांवर केली आहे.