कापसाच्या गंजीत दबून ६ वर्षीय चिमुकल्याने गमावले प्राण

अथर्व खेळता खेळता ऊकलून ठेवलेल्या कापसासह खड्ड्यामध्ये जाऊन पडला. त्याच्या अंगावर वरून कापूस पडत गेला. दुर्दैवाने यावेळी घरी कोणी नव्हतं. घरात कोणही नसल्याने ते कुणाच्याही लक्षात आले नाही आणि नंतर जे घडलं ते मन हेलावून टाकणारं होतं.

    अकोला (Akola) : अकोला जिल्ह्यातल्या पातुर तालुक्यातील चरणगाव येथे एका बालकाचा कापसाच्या गंजीखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही हृदयाचा ठोका चुकवणारी घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.

    घडलं असं की….
    आता सध्या शेतकऱ्यांचा कापसाचा हंगाम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात कापसाच्या गंजी लागलेल्या आहेत. अशातच पातूर तालुक्यातील चरणगाव या गावातील मुरलीधर तांबळे यांच्या घरात कापसाची मोठी गंजी लावलेली होती. या गंजीतील कापूस खराब झाला की चांगला आहे ते पाहण्यासाठी घरातील कापसाची गंजी उकरून काढण्यात आली.

    यावेळी कापूस उकलून ठेवण्यात आला आणि कापसाच्या गंजीमध्ये तयार झालेला खड्डा तसाच ठेवून घरातील सर्व व्यक्ती आपापल्या कामत तर काही घराबाहेर गेले होते. तेवढ्यातच ६ वर्षीय अथर्व खेळता खेळता त्या कापसाच्या गंजीवर चढला. मात्र, घडलं असं की अथर्व खेळता खेळता ऊकलून ठेवलेल्या कापसासह खड्ड्यामध्ये जाऊन पडला. त्याच्या अंगावर वरून कापूस पडत गेला. दुर्दैवाने यावेळी घरी कोणी नव्हतं. घरात कोणही नसल्याने ते कुणाच्याही लक्षात आले नाही आणि नंतर जे घडलं ते मन हेलावून टाकणारं होतं.

    नंतर काही वेळाने घरातील व्यक्तींना अथर्व कुठे दिसला नाही. बराच वेळ त्याचा शोध सुरू होता. त्यानंतर अखेर कापसाची गंजी उकळून पाहिली असता जे समोर आलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. कापसाच्या गंजीतील खड्ड्यामध्ये अथर्व हा मृतावस्थेत आढळून आला. डोळ्यासमोर खेळत असलेला ६ वर्षांचा अथर्व कधी त्यांच्यातून निघून गेला त्यांना कळलंच नाही.