धक्कादायक! खेळता खेळता बाळाने चक्क नेलकटरच गिळलं

    नाशिक : रडत असणार मुलं शांत रहावं यासाठी अनेकदा घरातील व्यक्तींकडून त्यांच्या समोर कोणतीही कुतूहल वाढवणारी वस्तू ठेवली जाते. मात्र जर तुम्ही असं करत असाल तर ही गोष्ट तुमच्या अंगलट येऊ शकते. नाशिक (Nashik) शहरातील नाशिकरोड परिसरात आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर (Nail Cutter) गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या बाळाच्या गळ्यातील नेलकटर काढण्यासाठी पालकांनी मोठी धावपळ केल्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

    आठ महिन्याच्या मुलाने खेळता खेळता बेबी नेलकटर गिळल्याची घटना काल दुपारी नाशिकरोड परिसरात घडली होती. मुलाने नेलकटर गिळल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढले. मुलाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

    आशिष शिंदे अस या बाळाचे नाव असून हा मुलगा घरामध्ये खेळत असताना त्याच्या हातामध्ये नेलकटर आले त्यानंतर बाळाने तोंडात घातले नंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचा आईने बघितले. बाळाच्या आईने तात्काळ नाशिकच्या आडगाव परिसरातील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी बाळावरती शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढले. सध्या मुलाची प्रकृती स्थिर असून त्याला कुठलीही इजा पोहोचलेली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी नेलकटर बाहेर काढण्यात आल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या ७ ते ८ महिन्याच्या बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तत्परता दाखवल्याने बाळाचा जीव वाचला आहे.