नायर रुग्णालयांमध्ये १६४८ परिचरिकांचा तुटवडा; तातडीने भरतीची मागणी

परिचारिकांना कामाचा ताण उचलण्यास भाग पाडले जात आहे. याचा विपरीत परिणाम परिचारिकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर तर होत आहेच, त्याशिवाय रुग्णसेवेवरही होत आहे, असेही बने यांनी म्हटले आहे. १०० हून अधिक संख्या असलेल्या रुग्णांसाठी एक किंवा दोन परिचारिका नेमल्याने रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे.

    मुंबई (Mumbai) : नायर रुग्णालयामध्ये १६४८ परिचारिकांचा तुटवडा असल्याने सेवेत असलेल्या परिचरिकांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. सध्या कोरोनाची आणि ओमायक्रॉंनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने या रुग्णालयात परीचारकांची तातडीने भरती करण्याची मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे.

    महापालिकेने सध्या केवळ ६८८ पदे मंजूर केली आहेत. म्हणजेच प्रत्येक दोन परिचारिकांना ५ परिचारिकांचा कामाचा ताण पडत आहे. या रुग्णालयामध्ये १६४८ परिचारिकांचा तुटवडा आहे. नायर रुग्णालयाप्रमाणे केईएम, सायन, कुपर, शताब्दी, भाभा, राजावाडी आणि इतर रुग्णालयांमध्ये तशीच अवस्था आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईची लोकसंख्या दुप्पटीहून अधिक प्रमाणात वाढली आहे. परिणामी, रुग्णसंख्या सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दुर्दैवाने या स्थितीचे भान नसलेल्या आणि कोणतीही दूरदृष्टी व राजकीय इच्छाशक्ती नसलेल्या राजकीय पक्षांनी मुंबईकरांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडेल अशी स्थिती निर्माण करून ठेवली आहे. आरोग्य सेवेचे खासगीकरण केले आहे. रुग्णवाढिच्या प्रमाणात या रुग्णालयातील आवश्यक मनुष्यबळ वाढविण्याची तसदी घेतलीच नाही नसल्याचे युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी म्हटले आहे .

    परिचारिकांना कामाचा ताण उचलण्यास भाग पाडले जात आहे. याचा विपरीत परिणाम परिचारिकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर तर होत आहेच, त्याशिवाय रुग्णसेवेवरही होत आहे, असेही बने यांनी म्हटले आहे.

    १०० हून अधिक संख्या असलेल्या रुग्णांसाठी एक किंवा दोन परिचारिका नेमल्याने रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे.

    नर्सिंग कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परिचारिकांची पदे निर्माण करावीत आणि तातडीने मुंबई महापालिकेत परिचारिकांची भरती करावी, अशी मागणी बने यांनी केली आहे.