धावडी विकास सेवा सोसायटीत श्री काळभैरवनाथ पॅनेलचा ११-० असा दणदणीत विजय

धावडी, पिराचीवाडी आणि गुंडेवाडी अशा एकत्रित धावडी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अकरा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत श्री काळभैरवनाथ पॅनेलने सत्ताधार्‍यांच्या पॅनेलचा पराभव करत ११-० असा दणदणीत विजय मिळवला.

  वाई : धावडी, पिराचीवाडी आणि गुंडेवाडी अशा एकत्रित धावडी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अकरा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत श्री काळभैरवनाथ पॅनेलने सत्ताधार्‍यांच्या पॅनेलचा पराभव करत ११-० असा दणदणीत विजय मिळवला.

  निवडणुकीच्या प्रचारादरम्यान श्री काळभैरवनाथ पॅनेलच्या पॅनेल प्रमुखांनी सत्ताधार्‍यांच्या नियोजनशून्य कारभाराची माहिती शेतकरी सभासदांसमोर पुराव्यासह सादर केल्याने सभासदांनी श्री काळभैरवनाथ पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करत पुन्हा एकदा सत्तांतर केले. सत्ताधार्‍यांना केवळ एका बिनविरोध जागेवर समाधान मानावे लागले.

  धावडी विकास सेवा सोसायटीची निवडणूक जाहीर झाल्यापासून येथे मोठी चुरस पहायला मिळाली. सतीश (नाना) मांढरे यांच्या नेतृत्वाखाली श्री काळभैरवनाथ पॅनेलचे प्रमुख संजय मांढरे, राजेंद्र पेटकर, पांडुरंग घोरपडे आदींनी अनुभवी कार्यकर्त्यांसह तरुणाईला सोबत घेत प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली होती. निवडणुकीच्या तोंडावर लाभांश जाहीर करत सत्ताधार्‍यांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेतकरी सभासदांनी सत्ताधार्‍यांचे प्रयत्न हाणून पाडत श्री काळभैरवनाथ पॅनेलच्या चालण्याची काठी या चिन्हाला पहिली पसंती देत सर्वच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी केले. निवडणुकीच्या निकालानंतर श्री काळभैरवनाथ पॅनेलच्या समर्थकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला.

  श्री काळभैरवनाथ पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :

  सर्वसाधारण गट : 1) सतीश मांढरे (174), नितीन मांढरे (174), राजेंद्र पोळ (175), प्रभाकर मांढरे (171), ज्ञानदेव मांढरे (167), कृष्णा पेटकर (165), प्रकाश पवार (163), संपत कोचळे (157) महिला गट : पद्मा मांढरे (177), प्रभावती धुमाळ (174) अनु. जाती/जमाती गट : परशुराम गंगावणे (178). श्री काळभैरवनाथ पॅनेलच्या विजयासाठी धावडी, पिराचीवाडी, गुंडेवाडी, कांबटवस्ती, मिलिंदनगर येथील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. आ. मकरंद (आबा) पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन (काका) पाटील, सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, पं. समिती मा. उपसभापती शंकरराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा मनिषाताई गाढवे, शंकर मांढरे, जयसिंग जगताप, संजय चौधरी आदींनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

  निवडणूक तरुणाईच्या ताब्यात

  सोसायटी निवडणुकीत श्री काळभैरवनाथ पॅनेलच्या प्रचारासाठी धावडी, पिराचीवाडी, गुंडेवाडी, कांबटवस्ती, मिलिंदनगर येथील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. उमेदवारी देण्यापासून ते प्रचाराची यंत्रणा राबवण्यापर्यंत सर्व कामे युवकांवर सोपविण्यात आली होती. प्रचाराचा धडाका लावत, जुन्या जाणत्यांना बरोबर घेऊन नियोजनबद्ध प्रचार करत युवा कार्यकर्त्यांनी सत्ताधार्‍यांच्या पॅनेलला चारीमुंड्या चीत करत पुन्हा सत्तांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.