सिध्दनाथ यात्रेची लगबग सुरु

    म्हसवड : म्हसवड शहरात होत असलेल्या श्री. सिध्दनाथाच्या यात्रेनिमीत्त यात्रा पटांगणावर विविध प्रकारची दुकाने लावण्याची लगबग व्यापारी वर्गाची सुरु झाली असुन या लगबगीमुळे मात्र यात्रा पटांगणावर हळुहळु गर्दीची वर्दळ सुरु झाल्याचे दिसून येत आहे. २४ नोव्हेंबर रोजी म्हसवड चे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव संपन्न होत आहे. यानिमीत्त म्हसवड शहरात मोठ्या प्रमाणावर भरणार्या यात्रेची लगबग सध्या सुरु झाली असल्याचे चित्र शहरात दिसुन येत आहे. यात्रेत लागणारे विविध प्रकारचे पाळणे, मेवा मिठाईची दुकाने, मनोरंजनाची दुकाने लावण्यासाठी म्हसवड पालिकेकडून यात्रा पटांगणावर जागा देण्यास प्रारंभ करण्यात आला असुन ज्यांना याठिकाणी जागा दिली गेली आहे,अशा दुकानदारांनी यात्रा पटांगणावर आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. गत दोन वर्ष कोरोनामुळे म्हसवड ची यात्रा होवु शकली नाही त्यामुळे म्हसवडकर जनता व लाखो भाविकांना सिध्दनाथ यात्रेचा आनंद लुटता आलेला नव्हता, यंदा मात्र म्हसवड ची ही यात्रा होणार असल्याने म्हसवडकरांसह भाविकांमध्येही प्रचंड उत्साह पहावयास मिळत असून यंदाची सिध्दनाथ यात्रा ही शहरात ऐतिहासिक यात्रा होण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवली जात आहे.