सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत बालब्रम्हचारी महाराज यांचे देहावसान

    नेवासा : नेवासा तालुक्यातील टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत १००८ बालब्रम्हचारी महाराज यांचे शुक्रवारी रात्री वयाच्या ९९ व्या वर्षी देहावसान झाले. त्यांच्या अकस्मात निधनाने भक्त परिवारात मोठी शोककळा पसरली आहे. शनिवारी संत महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत अश्रू नयनांनी त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

    समाधिस्त होण्यापूर्वी सकाळी ११ वाजता महंत बालब्रह्मचारी महाराज यांना पुष्पांनी सजविलेल्या पालखीत बसविण्यात आले. मंदिराला गोल प्रदक्षिणा झाल्यावर त्यांना स्मृती स्थळ स्थानावर आणण्यात आले. यावेळी निघालेल्या शोभायात्रेमध्ये देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनील गिरी महाराज, ब्रह्मचारी महंत ऋषीनाथजी महाराज यांच्यासह देशातून आलेले संत महंत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या इच्छेनुसार गोदावरी प्रवरा नदीच्या संगमावर बांधण्यात आलेल्या त्यांच्या स्मारकावर हिंदू धर्माच्या वैदिक पद्धतीने त्यांच्यावर वेदमंत्राच्या जयघोषात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अंत्यदर्शन घेतले.