ओरोस येथे साडेसात लाखांचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

बोलेरो गाडी क्रमांक एमएच-०७- एजे-२८५१ या गाडीला थांबवुन गाडीतील दोघांची आणि वाहनाची चौकशी करण्यात आली.

    सिंधुदुर्ग : गोवा-मुंबई महामार्गावर ओरोस येथे बोलेरो गाडीतून सुरू असलेला साडेसात लाखांचा अवैध गुटख्याचा साठा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केला. याप्रकरणी बोलेरो गाडीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अभय नारायण केसरकर (वय ४३, रा. बांदा काळसेवाडी, ता.सावंतवाडी) आणि महादेव सुभाष नेवगी (वय ३३, रा. इन्सुली डोबवाडी ता. सावंतवाडी) अशी संशयितांची नावे असून त्यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांच्या पथकाला गोवा-मुंबई महामार्गावरुन कणकवलीच्या दिशेने पहाटे अवैध गुटख्याची बोलेरो गाडीतुन वाहतुक होणार आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहा. पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेडकॉन्टेबल प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर, बांचे पथकाने जिजामाता चौक ओरोस या ठिकाणी सापळा रचला होता.

    बोलेरो गाडी क्रमांक एमएच-०७- एजे-२८५१ या गाडीला थांबवुन गाडीतील दोघांची आणि वाहनाची चौकशी करण्यात आली. यावेळी गाडीमध्ये एकूण ७ लाख ५३ हजार ९८० रूपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखुजन्य पदार्थ मिळाले. सदर गाडी चालक आरोपी अभय नारायण केसरकर (वय ४३, रा. बांदा) व महादेव सुभाष नेवगी (वय ३३ रा. इन्सुली) यांच्याविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलमअंतर्गत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर हे करीत आहेत. चौकट अवैध धंद्यावर करडी नजर सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करुन अवैध व्यवसायात गुंतलेल्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले आहे.