थंडीतील स्मार्ट लुक

थंडीच्या सीझनमध्ये अनेक आकारांच्या टोप्यांना मागणी असते. पूर्वीपासून चालत आलेल्या माकडटोपीचे स्थान तर टिकून आहेच; पण नवे लुक देणाऱ्या, डोक्‍याला परफेक्‍ट बसणाऱ्या गोल टोप्यांचा ट्रेंडही जास्त आहे.

  थंडी पडली की स्वेटर, शाल, मफलर, टोपी असे गरम कपडे आपल्या कपाटांमध्ये गर्दी करायला लागतात. बाहेर जायचे तरी हे गरम कपड्यांचे ओझे विनातक्रार सांभाळावेच लागते; पण आता बाजारात लाइटवेट स्वेटर्स आले आहेत. गरम कपड्यांमध्येही स्मार्ट आणि फॅशनेबल लुकसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

  थंडी सुरू झाली, आता जुने, ठेवणीतले कपडे काढायला हवेत, असे विचार प्रत्येक घरात सुरू असतील. काही जण कोणते गरम कपडे घ्यावेत, अशाही विचारात असतील. काश्‍मीर वगैरेसारखी थंडी खरे तर आपल्याकडे पडत नाही. गरम कपड्यांशिवाय थंडीची मजा कसली? जुने स्वेटर्स घरात असतील तरी शाळा, ऑफिसला जाताना, बाहेर जाताना जरा चांगले, नवीन फॅशनचे स्वेटर किंवा जॅकेट घालावीशी वाटतातच.

  लहानांसाठी लाइटवेट स्वेटर्स
  एरवी ऑफिसला जाताना किंवा बाहेर जाताना एवढे चांगले कपडे घालायचे आणि त्यांच्यावर जाडेभरडे स्वेटर घालायचे म्हटले की लुकही खराब होतो आणि एवढा जाडा स्वेटर वागवायला नको वाटते. त्यातही भर उन्हात जर फिरायला बाहेर पडलो तर स्वेटर काढावा लागतो आणि त्याचे ओझे होते ते वेगळेच. हे झाले आपल्यासारख्या मोठ्या लोकांचे; पण मग लहान मुलांचे काय? त्यांना सकाळी सकाळी शाळेला जावे लागते आणि सकाळी एवढी थंडी पडते, की उठणेही मुश्‍किल होते आणि त्यात शाळेला जाणे म्हणजे कधी कधी शिक्षाच वाटते.

  मग थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून स्वेटर असतात; पण आधीच मुलांना दप्तराचे ओझे झालेले असते आणि त्यात स्वेटरचे ओझे नको वाटते. आता बाजारात मुलांसाठी खास लाइटवेट स्वेटर आले आहेत. वुलनचे स्वेटर हलके आणि रंगांमध्येही सुंदर असतात, हे झाले रूटीन. पण आजकाल एक वेगळा फॅशनचा ट्रेंड बाजारात आहे. यामध्ये पावसाळ्याच्या दिवसांत ज्या प्रकारे रेनकोटसाठी वेगळ्या प्रकारचे रेग्झिनचे कापड वापरले जाते, त्याच प्रकारे स्वेटर बनवताना स्वेटरचा वरचा भाग रेग्झिनचा तयार केला आहे. आत वुलन आणि त्यालाच ऍटॅच टोपी, तीही वुलन आणि रेग्झिनची आहे.

  या स्वेटरचे रंगही एवढे आकर्षक असतात, की थंडी नसली तरी खरेदी करण्याचा मोह व्हावा. हे स्वेटर 600 रुपयांपासून ते अगदी 2 ते 4 हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. यामध्ये विभिन्न ब्रॅंडच्या कपड्यांचा समावेश आहे. छोट्या मुलांच्या थंडीच्या कपड्यांमध्ये अनेक रंग उपलब्ध आहेत.

  शॉर्ट मिडी स्टाइल कोट
  हल्ली सर्व प्रकारच्या वयोगटासाठी बाजारात वेगवेगळ्या कट, फिट, रंग, लांबी आणि स्टाइलचे कोट, तसेच कोट ड्रेसेस उपलब्ध आहेत. कोटांचे वैशिष्ट्य म्हणजे ते वेगवेगळ्या आऊटफिटसोबत घालता येऊ शकतात. तसेच कोट ड्रेस म्हणजे शॉर्ट मिडी स्टाइलमध्ये तयार केलेले कोट. कोटमध्ये रंग, कपडे आणि बटण यांच्यासोबतच रंगीत एम्ब्रॉयडरी केलेली असते, ज्यामुळे या कोटांना वेगळाच लुक येतो. यामध्ये ओपन कोटची लांबी गुडघ्यापर्यंत किंवा थोडी जास्त असू शकते. या प्रकारचे कोट काश्‍मिरी किंवा ट्‌वीडने तयार केले जातात.

  यात एम्बॉसिंग, दोरी आणि क्विल्टिंगबरोबर लेझर वा डिजिटल प्रिंटचा वापर केला जातो. आजपर्यंत कोट या प्रकारात ब्लॅक, ब्लू, ब्राऊन, डस्की किंवा ग्रीन शेड्‌स मिळत होत्या; पण आता त्यात पिंक आणि पर्पल रंगांचाही वापर होत आहे. कोट व कोट ड्रेससाठी कपड्यांवरसुद्धा प्रयोग होत आहेत. स्पनसोबत वुलन, सॅटीन आणि सिल्क किंवा लेदर या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये किंवा पॅच देऊन कोटला स्टायलिश करण्यात येत आहे. बाजारात दोन ते अडीच हजार रुपयांपासून 25 हजार रुपयांपर्यंतचे कोट किंवा कोट ड्रेसेस उपलब्ध आहेत.
  सध्या जॅकेटचाही सगळ्यात जास्त बोलबाला आहे.

  आर्मी स्टाइल स्वेटर आणि जॅकेट यांना खूप मागणी आहे. ‘जब तक है जान’ चित्रपटातील शाहरुख खानच्या आर्मी लुककडे तरुणाई आणि मार्केट भलतेच प्रभावित झालेले आहे, त्यामुळे आर्मी लुकच्या जॅकेट-टोप्यांनी बाजारात धुमाकूळ घातला आहे. या आर्मी जॅकेटवर कार्टून्स, इंग्लंड, अमेरिका, तसेच ऑस्ट्रेलिया अशा देशांच्या झेंड्यांचे फोटो आहेत. त्यामुळे या जॅकेटचा लूक काही वेगळाच दिसतो. काही जॅकेटवर तर या झेंड्यांच्या फोटोंचे मस्तपैकी कोलाजही केलेले दिसून येते.

  बॉडी वॉर्मरचा ट्रेंड
  पुरुषांच्या स्वेटरमध्ये सध्या जॅकेट, स्वेट शर्ट आणि विभिन्न प्रकारच्या स्वेटरचा समावेश आहे. यामध्ये विथ स्लिव्ह्‌ज आणि विदाउट स्लिव्ह्‌ज स्वेटरचा समावेश आहे. सध्या कॉम्प्युटर प्रिटेंड स्वेटरचा जास्त ट्रेंड आहे. त्याचबरोबर पूर्वीसारख्या टिपिकल ब्राऊन, ब्लॅक रंगांचा समावेश आहेच; शिवाय एकदम लाइट शेड्‌स आणि ग्रीन, पोपटी रंगांचाही समावेश आहे. यामध्ये वुलनच्या टी-शर्टचाही समावेश आहे.

  त्याचबरोबर स्लिव्हलेस जॅकेटचा ट्रेंड जास्त आहे. यामध्ये हेवी वेट जॅकेटचा समावेश आहे. तुम्ही सुटीच्या दिवसांत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणार असाल तर ही जॅकेट स्टाइलिश तर वाटतातच आणि तुम्हाला एक वेगळा लूक देतात. या स्वेटरवरच्या प्रिंटिंगमध्ये डायमंड ब्लॉक, प्लेन, लाइन्सचा ट्रेंड जास्त चालतो; पण आजकाल ब्लॉक किंवा लाइन्स आणि ब्लॉकच्या कॉम्बिनेशनचा ट्रेंड वाढला आहे. यांची किंमत 500 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत आहे. हे झाले स्वेटर आणि जॅकेटांबद्दल; पण जर तुम्हाला असे स्वेटर आणि जॅकेट न घालता थंडीपासून संरक्षण करायचे असेल तर आजकाल ‘बॉडी वॉर्मर’चा ट्रेंड वाढतोय. हे कपडे खूप पातळ असतात.

  नुसते उन्हाळ्याच्या दिवसांत जसे लाइट कपडे घालून आपण फिरतो तसे थंडीतही घालू शकतो. हे कपडे तुम्ही ऑफिसला जाताना शर्टच्या आत घालू शकता. त्याचबरोबर हा पूर्ण सेटही उपलब्ध आहे- ज्यामध्ये पॅंट आणि शर्टचा समावेश असतो. हे सेट 2000 रुपयांपासून उपलब्ध आहेत.

  वुलन सॉक्‍स
  खास थंडीसाठी प्युअर वुलनचे सॉक्‍सही बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये प्लेनबरोबर प्रिंटेड सॉक्‍सचा समावेश आहे. हे सॉक्‍स लांबीला जास्त असतात. थंडीमुळे जर गुडघे जास्त दुखत असतील, तर गुडघ्यांना कव्हर करणारे खास सॉक्‍स उपलब्घ आहेत. आजकाल तरुण लोकही यांचा वापर करतात. हे सॉक्‍स 300 ते 1000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. महिलांना थंडीसाठी खास व्हरायटी उपलब्ध आहे. यामध्ये जुन्या पद्धतीचे स्वेटर वापरायचे नसतील तर आजकाल वुलनचे कुर्ते उपलब्ध आहेत. त्याचबरोबर एक वेगळ्या प्रकारचे मटेरिअलही उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्या कपड्यांसारखेच गरम वाटेल.

  हे कुर्ते प्लेन आणि विविध रंगांमध्ये आहेत. एम्ब्रॉयडरी, कॉम्प्युटर प्रिंट असे डिझायनिंगचे काही प्रकार यात आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे स्वेटर महिलांसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये पूर्ण जॅकेटच्या स्वरूपात असणारे स्वेटर ऑफिशियल लुकमध्ये उपलब्ध आहेत. पोलो नेक, टी नेकमध्ये, फुल स्लिव्ह्‌ज, लाइट वेट आणि विभिन्न रंगांमध्ये उपलब्ध आहेत. हे स्वेटर तुम्ही कॉलेज अथवा ऑफिसमध्येही घालू शकता. महिलांसाठी जॅकेटही अनेक प्रकारांत आहेत. या जॅकेटांमध्ये अनेक रंग आहेत. खास मुलींसाठी स्टायलिश स्वेटरचा भडिमार आहे. यामध्ये या स्वेटरना टोपीही ऍटॅच असते, त्याचबरोबर हे स्वेटर उंचीला कमी असतात आणि समोरच्या बाजूला खिसे असतात.

  टोपी तर हवीच
  थंडीच्या सीझनमध्ये अनेक आकारांच्या टोप्यांना मागणी असते. पूर्वीपासून चालत आलेल्या माकडटोपीचे स्थान तर टिकून आहेच; पण नवे लुक देणाऱ्या, डोक्‍याला परफेक्‍ट बसणाऱ्या गोल टोप्यांचा ट्रेंडही जास्त आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात वापरतात तशी टोप्याही खास थंडीसाठी उपलब्ध आहेत. म्हणजे ही टोपी तुमचे थंडीपासून तर संरक्षण करेलच, त्याचबरोबर उन्हापासूनही रक्षण करेल. या टोप्या अगदी 100 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. याचबरोबर यामध्ये मफलरही आपली जागा टिकवून आहे.

  पूर्वी हे मफलर फक्त पुरुष वापरत असत; पण आजकाल खासकरून महिलांसाठीही मफलर उपलब्ध आहेत. त्यामुळे थंडीच्या दिवसांत जर तुम्हाला वाटत असेल, की फक्त जड स्वेटर घालून फिरायला लागेल, तर हे चुकीचे आहे. कारण वरील सर्व पर्याय पाहता तुम्ही थंडीच्या दिवसांतही फॅशनेबल आणि स्मार्ट दिसू शकता, तेही गरम कपडे घालून!