….तर मी स्वत: एसटी चालवत सेवा सुरू करणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा

येत्या दोन दिवसात जर एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला नाही, तर मी स्वतः बस चालवत आपल्या मतदार संघातील एसटी बस सेवा सुरू करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. 

    जळगाव : येत्या दोन दिवसात जर एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला नाही, तर मी स्वतः बस चालवत आपल्या मतदार संघातील एसटी बस सेवा सुरू करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

    एसटी संपामुळे सर्वसामान्य जनेतेचे हाल होत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील गारखेडा इथे सकाळी अपघाताची घटना घडली. यामध्ये  घडला होता. यामध्ये तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.

    या घटनेला एसटी संप करणारे कारणीभूत

    एसटी कर्मचाऱ्यांचा संप  सुरू असल्याने प्रवाशांना नाईलाजाने रिक्षाने तसेच अन्य वाहनाने प्रवास करावा लागत आहे. रिक्षाने प्रवास करताना अधिकचे प्रवासी बसल्याने गारखेडा इथे अपघाताची घटना घडली. या घटनेला एसटी संप करणारे कारणीभूत असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कितीही महत्त्वाच्या असल्या तरी त्यांनी आता जनतेचा विचार करुन, ताबडतोब बससेवा सुरू करावी असे आवाहन पाटील यांनी केले. एसटी सेवा बंद असल्याने सामन्य नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी जर येत्या दोन दिवसात बससेवा सुरू केली नाही तर मात्र मी स्वतः बस चालवणार आहे. माझे कार्यकर्ते देखील आपल्या मतदारसंघात बस सेवा सुरू करतील, असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

    आता संप किती दिवस लांबवायचा?

    सध्या प्रवाशांना काहीच पर्याय नसल्याने ते मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. त्यांचे हाल सध्या आम्हाला बघवत नसल्याचे पाटील म्हणाले. सर्वच कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मात्र, आता संप किती दिवस लांबवायचा? असा सवाल देखील पाटील यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने ज्या सुविधा दिल्या आहेत, त्या त्यांनी स्विकाराव्यात आणि तोबडतोब एसटीची सेवा सुरू करावी अशी विनंती पाटील यांनी कर्मचाऱ्यांना केली आहे. दरम्यान, आज झालेला अपघात ही दुर्दैवी घटना असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.