
या बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस सतर्क असून शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्याने महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानं करण्यात येत आहे. या विरोधात राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पहायला मिळत आहे. या विरोधात सामान्य लोकांमध्येही रोष आहे. याचाच परिणाम म्हणून नुकतचं औरंगाबाद आणि पुण्यातही बंद पुकारण्यात आला. या पार्श्वभुमीवर आता सोलापूरातही (Solapur Bandh) बंद पुकारण्यात आला आहे. आज सकाळपासूनच सोलापुरातील व्यवहार ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद आहेत.
गेल्या काही दिवसातं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. या विरोधात आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने दुपारी दोन वाजेपर्यंत सोलापूर बंद पुकारला आहे. हा बंद शांततेत करण्यात येईल. या बंदमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार असल्याची माहिती मंडळाचे उत्सव अध्यक्ष शेखर फंड यांनी दिली.
मविआचा पाठिंबा तर भाजप, मनसेचा विरोध
या सोलापूर बंदला महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी, काँग्रेस यासह छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, प्रहार संघटना यांच्यासह विविध व्यापारी संघटनाचा या बंदला पाठिंबा आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, मनसे या पक्षांचा या बंदला विरोध आहे.
शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
या बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस सतर्क असून शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 9 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 27 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 154 पोलीस अंमलदार, चार राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, 9 जलद प्रतिसाद टीम शहरातील बंदोबस्तामध्ये सहभागी आहेत. अशी माहिती सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.