सोलापूरचे दूरदर्शन केंद्र ३१ डिसेंबरपासून बंद; प्रसार भारतीचा निर्णय

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (चॅनल क्रमांक ७), सोलापूर (चॅनल क्रमांक १२) आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा (चॅनल क्रमांक ५) ही केंद्रे ३१ डिसेंबरनंतर कायमची बंद होतील. यापूर्वी हे प्रक्षेपण केंद्र बंद करण्याची तारीख ३१ मार्च २०२२ होती. नंतर ती बदलून ३१ डिसेंबर २०२१ करण्यात आली.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : केंद्र सरकारच्या अखत्यारितील सोलापूरचे दूरदर्शन (Doordarshan) लघुप्रक्षेपण केंद्र येत्या ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून बंद केले जाणार आहे. केंद्र शासनाच्या प्रसार भारती (Prasar Bharati) मंडळाने हा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (चॅनल क्रमांक ७), सोलापूर (चॅनल क्रमांक १२) आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा (चॅनल क्रमांक ५) ही केंद्रे ३१ डिसेंबरनंतर कायमची बंद होतील. यापूर्वी हे प्रक्षेपण केंद्र बंद करण्याची तारीख ३१ मार्च २०२२ होती. नंतर ती बदलून ३१ डिसेंबर २०२१ करण्यात आली. प्रसार भारतीच्या मुख्य कार्यालयातून याबाबतची सूचना संबंधित लघुप्रक्षेपण केंद्रांना ई- मेलद्वारे पाठविण्यात आली आहे.

    दूरदर्शन अनुरक्षण केंद्र सोलापूरचे सहाय्यक आभियांत्रिकी निदेशक एस. आर. देशपांडे यांनी याला दुजोरा देताना सांगितले की, प्रसार भारती बोर्ड आणि दूरदर्शन महानिदेशक नवी दिल्ली यांच्या आदेशानुसारच ही तिन्ही दूरदर्शन लघुशक्ती केंद्रे बंद करण्यात येत आहेत. पंढरपूरचे केंद्र यापूर्वीच बंद करण्यात आले आहे. अकलूज, उमरगा आणि सोलापूर ही तीन केंद्रे ३१ तारखेनंतर बंद होतील. हे तीन लघुप्रक्षेपण केंद्रे बंद होणार असले तरी या चॅनलवरचे सर्व कार्यक्रम दूरदर्शन डीडी फ्री डिश तसेच डीटीएचवर उपलब्ध असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

    सेट टॉप बॉक्स, डिश अँटिना आणि इतर ऍक्सेसरीज स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने लोकांना दूरदर्शनचे कार्यक्रम पाहता येतील. अधिक माहितीसाठी जवळच्या दूरदर्शन कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा आमच्या www.india.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही देशपांडे यांनी सांगितले.