शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला सीए; पहिल्याच प्रयत्नात यशस्वी

सनदी लेखपाल (सीए) परीक्षेत वावरहिरे ता. माण येथील शेतकरी कुटुंबातील प्रतीक जाधव हा सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला. वावरहिरे तसेच पंचक्रोशीतील सीए परीक्षा उत्तीर्ण होणारा तो पहिलाच तरुण ठरला. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्याने या परीक्षेत यश संपादन केले.

  वावरहिरे : सनदी लेखपाल (सीए) परीक्षेत वावरहिरे ता. माण येथील शेतकरी कुटुंबातील प्रतीक जाधव (Pratik Jadhav) हा सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला. वावरहिरे तसेच पंचक्रोशीतील सीए परीक्षा उत्तीर्ण होणारा तो पहिलाच तरुण ठरला. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्याने या परीक्षेत यश संपादन केले. त्याच्या या दैदिप्यमान यशानंतर त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  वावरहिरे ग्रामस्थांच्या वतीने गावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत वाघ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सदस्य मल्हारी जाधव, ज्ञानदेव आनेकर, विष्णू चव्हाण, तुलशीराम यादव, शिवाजी धर्माधिकारी, राजू मुळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

  वावरहिरे येथील जाधववस्ती या छोट्याशा लोकवस्तीवर राहणारे प्रतीकचे आजोबा जगन्नाथ जाधव हे या परिसरातील एक आदर्श शेतकरी म्हणून ओळखले जातात. तर वडील दत्तात्रय जाधव हे पुण्यातील नामांकित महिंद्रा कंपनीत उच्चपदस्थ आहेत. प्रतीक हा त्यांचा व कुटुंबाचा लाडका असल्याने त्यांनी त्याला योग्य मार्गदर्शन करत त्याच्या आवडी व मनाप्रमाणे  चांगले शिक्षण दिले. आज तो सीए परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.

  प्रतिकचे प्राथमिक शिक्षण सातारच्या निर्मला काॅन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. तर त्याने पुढील महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील आबासाहेब गरवारे काॅलेजमधून पूर्ण केले.

  आजोबा, आई-वडील आणि दोशी यांचा सिंहाचा वाटा

  महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्याने सनदी लेखपाल परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. या परीक्षेच्या  संबंधित असणार्‍या अडीअडचणी व प्राथमिक माहिती महिंद्रा कंपनीतील डायरेक्टर असणारे भरत दोशी यांच्याकडून त्याला मिळाली. तसेच त्यांनी त्याला वेळोवेळी योग्य असं मार्गदर्शन केले, प्रेरणा दिली. कोणताही क्लास न लावता साधारणत: रोज आठ ते दहा तास परिपूर्ण एकाग्रतेने अभ्यास केला. या यशामध्ये भरत दोशी, आजोबा व आई-वडील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे तो सांगतो.