सोपानकाका संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ; हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली सासवडनगरी

संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यास आज सोमवारपासून ( दि. २७ ) प्रारंभ झाला. रविवार, दि. २ जानेवारीपर्यंत हा सोहळा सुरु राहणार आहे. यानिमित्त राज्याच्या विविध भागातून दिंड्यांचे आगमन सुरु झाले आहे.

  सासवड : संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या ओव्या गात तसेच टाळ – मृदूंगाच्या गजर करीत मोठ्या उत्साहात संत सोपानकाका संजीवन समाधी सोहळ्यास सासवड येथे प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त मंदिरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

  दिंड्यांचे आगमन

  संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यास आज सोमवारपासून ( दि. २७ ) प्रारंभ झाला. रविवार, दि. २ जानेवारीपर्यंत हा सोहळा सुरु राहणार आहे. यानिमित्त राज्याच्या विविध भागातून दिंड्यांचे आगमन सुरु झाले आहे. त्यामुळे मंदिर आणि परिसरात आजपासून भजन, कीर्तन, हरिपाठ अशा विविध प्रकारे हरिनामाचा जागर सुरु झाला आहे.

  विविध धार्मिक कार्यक्रम

  सासवड ( ता. पुरंदर ) येथे कऱ्हा नदीच्या काठावर संत सोपानदेव मंदिरात पहाटे काकडा आरती, त्यानंतर विधिवत अभिषेक करून समाधीस महापूजा करण्यात आली. दरम्यान सकाळी कोडीत येथील कीर्तनकार हभप संभाजी महाराज बडदे यांचे कीर्तन झाले. सायंकाळी हभप विजय भिसे यांचे प्रवचन तर रात्री एकनाथ महाराज पवार यांचे रात्री कीर्तन, त्यानंतर सासवड येथील हनुमान भजनी मंडळाचे जागर झाले.
  मंगळवारी (दि. २८) सकाळी परशुराम काळे (काळेवाडी) यांचे तर सायंकाळी सोपानराव वाईकर यांचे प्रवचन त्यानंतर रात्री परकाळे दिंडीचे कीर्तन तसेच कुंभारवळण ग्रामस्थांच्या वतीने संगीत भजनाचा जागर झाला.
  दरम्यान, सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी मंदिराला भेट देवून सोहळ्याची तसेच सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगितले. यावेळी संत सोपानदेव देवस्थानचे विश्वस्त त्रिगुण गोसावी, व्यवस्थापक हिरुकाका गोसावी, चोपदार सिद्धेश शिंदे, मनोज रणवरे, गोपनीय विभागाचे पोलीस नाईक लिकायत मुजावर, हनुमंत साळुंखे आदी उपस्थित होते.