एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईला वेग; तब्बल ‘इतक्या’ निलंबित संपकऱ्यांना केलं बडतर्फ

विलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या दोन महिन्यापासून ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

    मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या दोन महिन्यापासून ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. महामंडळाने आणखी १७४ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आत बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४१५ वर पोहचली आहे. याशिवाय आतापर्यत महामंडळाने १० हजार ७३१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून या निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणेदाखवा नोटीस बजावली जात आहे.

    बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४१५ वर 

    एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संप दिवसेंदीव चिघळ जात आहे. दोन महिने होऊन सुद्धा एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरु केली आहे. महामंडळाने आतपर्यत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून १० हजार ७३१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय २ हजार ७९६ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. मात्र, निलंबनाच्या कारवाई नंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. निलंबित कामगारांना आतापर्यत मंडळाकडून दोन वेळा संधी देण्यात आलेली होती. मात्र संधी देऊन सुद्धा निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणेदाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसता ६०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस महामंडळाकडून बजवाली आहे. तर आज महामंडळाने १७४ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४१५ वर पोहचली आहे.

    कारवाईला स्थगिती देण्यास नकार-

    एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्या कारवाई विरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर व यवतमाळ येथील कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून आता निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फची कारवाई जोरात सुरु केली आहे.