रस्त्याने चालताना मिळणार स्पीड ब्रेकर, खड्ड्यांचा अलर्ट ; रस्ते वाहतूक मंत्रालयाचं Navigation App आलं

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) ने देशातल्या चालक आणि रोड सेफ्टी टेक्नॅलॉजीसाठी IIT मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी मॅप माय इंडिया (MapmyIndia) यांनी मिळून हे ॲप लाँच केलं आहे.

  नवी दिल्ली : देशात सातत्याने द्रुतगती मार्ग आणि महामार्ग बांधले जात आहेत. अनेक कार्यान्वितही झाले आहेत. तर काहींचं वेगाने काम सुरू आहे. अशातच रस्त्यावर गाडी चालविणाऱ्या लोकांची सुरक्षा लक्षात घेता एक फ्री-टू-युज-नेव्हिगेशन ॲप लाँच करण्यात आलं आहे. याला मूव्ह (MOVE) असं नाव देण्यात आलं आहे. यामुळे रस्त्यांवर चालणाऱ्या लोकांना अपघाताच्या धोक्यांबाबत अलर्ट मिळणार आहे. यात अनेक प्रकारची रोड सेफ्टी फीचर्सही देण्यात आली आहे.

  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) ने देशातल्या चालक आणि रोड सेफ्टी टेक्नॅलॉजीसाठी IIT मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी मॅप माय इंडिया (MapmyIndia) यांनी मिळून हे ॲप लाँच केलं आहे.

  ब्रेकर्स, कर्व, खड्डे यांची मिळणार माहिती

  नेव्हिगेशन ॲप सेवा चालकांना आगामी अपघात प्रवण क्षेत्रे, स्पीड ब्रेकर्स, तीक्ष्ण वक्र आणि खड्डे यासह इतर धोक्यांबद्दल व्हॉइस आणि व्हिज्युअल अलर्ट प्रदान करते. देशातील रस्ते अपघातांमुळे होणारे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या योजनेचा हा एक भाग आहे.

  IIT मद्रास आणि मॅप माय इंडिया डेटा विश्लेषण करतील

  MapMyIndia ने विकसित केलेल्या नेव्हिगेशन सेवा ॲप मूव्हने २०२० मध्ये सरकारचे आत्मनिर्भर ॲप इनोव्हेशन चॅलेंज जिंकले. या सेवेचा वापर नागरिक आणि अधिकारी नकाशावर अपघात, असुरक्षित क्षेत्र, रस्ता आणि रहदारी समस्या नोंदवण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी आणि इतर वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी करू शकतात. आयआयटी मद्रास आणि मॅप माय इंडियाद्वारे डेटाचे विश्लेषण केले जाईल. त्यानंतर भविष्यात रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्याचा उपयोग सरकार करेल.

  IIT मद्रासचे डेटा आधारित रस्ता सुरक्षा मॉडेल स्वीकारले

  गेल्या महिन्यात, रस्ते मंत्रालयाने अधिकृतपणे IIT मद्रास येथील संशोधकांनी जागतिक बँकेच्या निधीतून विकसित केलेले डेटा आधारित रस्ता सुरक्षा मॉडेल स्वीकारले. ३२ पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि आपत्कालीन प्रतिसाद सुधारण्यासाठी संस्थेने विकसित केलेल्या एकात्मिक रोड अपघात डेटाबेस (iRAD) मॉडेलचा वापर करतील.

  IIT टीमने २०३० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी आणि रस्ते वाहतूक अपघातांमुळे होणारे ० मृत्यू लक्ष्य करण्यासाठी विविध राज्य सरकारांशी करार केले आहेत. त्यासाठी ते रोडमॅप तयार करणार आहेत.