एसटी आंदोलन पेटले; कुमठे, वंजारवाडी, कवठेएकंदजवळ गाड्यांवर दगडफेक

तासगाव तालुक्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास (ST Workers Strike) गुरुवारी हिंसक असे वळण लागले. कुमठे फाटा, कवठेएकंदसह वंजारवाडी फाटा या ठिकाणी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली.

    तासगाव : तासगाव तालुक्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास (ST Workers Strike) गुरुवारी हिंसक असे वळण लागले. कुमठे फाटा, कवठेएकंदसह वंजारवाडी फाटा या ठिकाणी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांची मनधरणी करुन प्रवाशांच्या सोयीसाठी काही मार्गावर बससेवा सुरु केली. परंतु शिवसेनेच्या या भूमिकेने कर्मचाऱ्यांमधील असंतोष उफाळून आला.

    विलिनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. सेनेचे पदाधिकारी संपात फूट पाडत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. सोमवारी विटा आगाराच्या बसवर कवठेएकंदजवळ दगडफेक झाली. दगडफेकीत चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना ताजी असताना गुरुवारी पुन्हा तासगाव तालुक्यात तीन बसवर दगडफेक झाली.

    कवठेएकंद गावाजवळ विटा आगाराच्या सांगली-विटा, कुमठे फाटा येथे तासगाव आगाराच्या तासगाव-सांगली, वंजारवाडी फाटा येथे विटा आगाराच्या सांगली-विटा या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीमुळे तालुक्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    पोलिस बंदोबस्त असूनही दगडफेक

    शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बससेवा सुरु केली आहे. पोलीस बंदोबस्तात प्रवासी वाहतूक सुरु झाल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांसह अनेक घटक नाराज झाले. अज्ञातांनी पोलिसांना चकवा देत गनिमी कावा करत काचा फोडल्या.