एसटी संप चिघळण्याची शक्यता, राज्यभरातील एसटी डेपोत आजही कर्मचारी फिरकले नाहीत, सरकारही आक्रमक, कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

  सांगली : गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. एसटीचे विलीनीकरण करण्यात यावे ही त्यांची मुख्य मागणी होती. मात्र विलीनीकरण न करता पगारवाढ देण्यात आल्याने राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात सांगलीमध्ये आंदोलकांनी गाजर दाखल अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. आम्हाला पगारवाढ नको आहे, विलीनीकरण करा, जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशाराही यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आज आंदोलक विलीनीकरण या मुद्द्यावर ठाम राहिले तर संप चिघळण्याची शक्यता आहे.

  विलीनीकरण हाच संपावर तोडगा

  गेल्या अनेक दिवसांपासून आमचे विलीनीकरणासाठी आंदोलन सुरू आहे. विलीनीकरण हाच एकमेव संपावर तोडगा काढण्याचा मार्ग असताना सरकारने आम्हाला पगार वाढीचे गाजर दाखवले. आम्हाला पगारवाढ नको, विलीनीकरण हवे आहे, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत विलवनीकरण होणार नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशाराही या कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे राज्यातील अनेक आगारामधील कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत विलनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याची सामुहीक शपथ घेतली आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार?

  1 ते 10 वर्षे सेवा– मूळ वेतनात 5 हजाराची वाढ, त्यामुळे मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्याचं वेतन आता 17 हजार 395 रुपये. त्याचं पूर्ण वेतन जे 17 हजार 80 रुपये होतं ते आता 24 हजार 594 रुपये झालं आहे. साधारण 7 हजार दोनशे रुपयांची म्हणजे एकूण 41 टक्के वाढ.

  10 ते 20 वर्षे सेवा – मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ. ज्यांचा पगार 16 हजार रुपये होता त्यांचा पगार 23 हजार 40 रुपये झाला. त्यांचा पूर्ण पगार आता 28 हजार 800 रुपये झालाय.

  20 वर्षे आणि त्याहून अधिक सेवा – 2 हजार 500 रुपयांची वाढ. ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजार 40 झालं आहे. ज्यांचं मूळ वेतन 37 हजार होतं आणि स्थुल वेतन 53 हजार 280 रुपये होतं. त्यांचा मुळ वेतन 39 हजार 500 होईल, तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होईल.